
कारवाईसाठी विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचे पालिका आयुक्तांना निवेदन
विरार(प्रतिनिधी)-वाढत्या ‘ओमायक्रोन’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू असतानाही बेकायदेशीर फेरीवाल्यांनी मनवेलपाडा परिसरात रस्त्यांवर मांडलेले बस्तान तसेच शहरात बोगस डॉक्टरांची सुरू असलेल्या दुकानदारी विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांनी आपल्या शिष्टमंडळासह काल नवीन पालिका अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन याप्रकरणी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.यावेळी आयुक्त अनिलकुमार पवार यांना शिवसेना प्रमुखांची प्रतिमा भेट देत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. दरम्यान पालिका आयुक्तांनी दोन्ही विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.याप्रसंगी
शिवसेना विरार मा. महिला शहर संघटक श्रद्धा जाधव,मनवेल पाडा विभाग प्रमुख दिलीप जाधव शिवसैनिक काशिनाथ साळवे हे उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे. परंतु या आदेशाची कोणतीच अंमलबजावणी पालिका क्षेत्रात होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे.
पालिका क्षेत्रांतील प्रभाग समिती बी अंतर्गत येणाऱ्या मनवेलपाडा परिसरात शासनाचे आदेश धाब्यावर बसवले जात असून पालिका अधिकारी तसेच कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.एकीकडे पालिका प्रशासन लग्न समारंभावर कारवाई करताना दिसत आहे. परंतु
याठिकाणी फेरीवाल्यांनी जमावबंदी असतानाही आपली खाद्यपदार्थांची दुकाने सुरू ठेवली असून याविरोधात पालिका अधिकारी कारवाईसाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करताना दिसत आहे. या दुकानांपुढे सायंकाळच्या वेळीस गर्दी जमा होत आहे.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना याठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याने विनायक भोसले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राजकीय दबाव व फेरीवाल्यांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे याठिकाणी कारवाई होत नसल्याचे भोसले यांनी यावेळी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.याठिकाणी फेरीवाल्यांनी रहदारीच्या रस्त्यांवरच आपले बस्तान मांडल्याने वाहन चालवण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची करावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक अपघातही घडत असल्याची बाब आयुक्तांपुढे मांडली.
दुसरीकडे विरार शहरातील बोगस डॉक्टरांच्या विषयावर चर्चा करत तात्काळ बोगस डॉक्टरांची शोधमोहीम राबवण्याची मागणी विनायक भोसले यांनी केली.वसई विरार पालिका क्षेत्रात कार्यरत सुनील वाडकर व हेमंत पाटील या दोन बोगस डॉक्टरांचे कारनामे समोर येत आहेत. विरार शहरात असे काही बोगस डॉक्टर आजही कार्यरत आहेत. चंदनसार,फुलपाडा,सहकार नगर, साईनाथ नगर, गास कोपरी, मनवेल पाडा,कारगिल नगर आदी ठिकाणी या बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने मांडली असून बोगस पदव्या दाखवून ते रुग्णांवर उपचार करत आहेत.
हे बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीविताशी खेळत असून या बोगस डॉक्टरांचा वेळीच बंदोबस्त करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे याप्रकरणी जातीने लक्ष घालवू विरार शहरातील बोगस डॉक्टरांची तात्काळ शोधमोहीम राबवून त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई प्रस्थावित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.