गुरू वाघमारेच्या वाढदिवसानिमित्त 17 जुलै रोजी हत्या करण्याचा प्लॅन होता, मात्र तो प्लान यशस्वी झाला नाही.

मुंबई – गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.मुंबईतील वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पामध्ये गुरु वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली. गुरूच्या संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गुरूला संपवण्यासाठी सहा लाखाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पार्टी केली आणि दोन तासात हत्या झाली

गुरू वाघमारे वरळीतील स्पाला नियमित भेट देत असे आणि तेथे काम करणाऱ्या लोकांशी त्यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच वाघमारेचा वाढदिवस होता. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तो स्पामध्ये पोहचला तेव्हा त्याच्या 21 वर्षाच्या गर्लफ्रेंडने आणि इतर तीन मित्रांनी बर्थडे पार्टीचा प्लान केला. त्यानंतर ते पार्टीसाठी सायनजवळील एका बारमध्ये गेले. बारमध्ये रात्री 12.30 पर्यंत पार्टी केल्यानंतर ते पुन्हा स्पामध्ये आले. स्पामध्ये आल्यानंतर काही वेळाने तिघेही मित्र निघून गेले. मित्र गेल्यानंतर गुरू आणि त्याची मैत्रीण मात्र स्पामध्येच थांबले

गर्लफ्रेंडसमोरच केले वार

दरम्यान, सुमारे दोन सुपारी घेतलेले हल्लेखोरांनी स्पामध्ये घुसून गर्लफ्रेंडसमोरच वाघमारेवर धारदार शस्त्राने वार केले.वाघमारे यांच्या मानेवर व बोटांवर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर गुरू वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व त्याचा गळा चिरलेला आढळून आला. वाघमारे हा स्पा मालकालाही ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांनी उघड केले. जे त्याच्या हत्येचे प्रमुख कारण मानले जात आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे.

वाढदिवसालाच खूनाचा प्लान फसला

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वाघमारेच्या मारेकऱ्याचाही समावेश आहे. वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त 17 जुलै रोजी हत्या करण्याचा प्लॅन होता, मात्र तो प्लान यशस्वी झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *