
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालय हद्दीत अनेक ठिकाणी गटारे उघडी असून झाकणे न बसविल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे. झाकणे बसविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालय हद्दीत अनेक ठिकाणी गटारे उघडी असून झाकणे बसविण्यात येत नसल्यामुळे गटारात पडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अपघात झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार का?
प्रभाग समिती आय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आवडेकर यांचे लक्ष आहे कुठे? उघड्या गटारांबाबत नागरिकांनी प्रभाग समिती कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. या प्रभागात गटारांवरील झाकणे बसविण्याकरिता ७५ लाखांचे टेंडर मंजूर झाले आहे. मात्र काम होताना दिसत नाही. झाकणे चोरीला जाण्याचे अनेक प्रकार घडतात. तसेच झाकणे तुटतात. असा आरोप केला जातो की, ठेकेदारच झाकणे चोरतात. आणि त्या ठिकाणी नवीन झाकणे बसविण्याचा ठेका मंजूर करून घेतला जातो. ठेकेदार व अधिकारी यांच्या अभद्र युतीतून हा भ्रष्टाचार होत आहे.
लोखंडी झाकणे चोरी होतात. त्यामुळे लोखंडी झाकणे न बसविता सिमेंटची झाकणे बसवावीत. सिमेंटची झाकणे चोरी होण्याची भीती नाही. कारण ती कोणी भंगारवाला विकत घेणार नाही. झाकणे चोरीला जाण्याचा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी झाल्यास नक्कीच मोठा घोळ समोर येईल. या बाबत आयुक्तांनी सखोल निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. २०१९ पासून दिल्या गेलेल्या ठेक्यांबाबत सखोल चौकशी व्हावी.