
तलासरी तालुक्यातील जाई आश्रम शाळेमधील विद्यार्थ्याला झिका विषाणूची लागण झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासन खडबडून गेले आहे. हा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. विद्यार्थी सुखरूप असून त्याच्यावर देखरेख सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात झाई आश्रम शाळेमधील एका विद्यार्थ्याला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचा नमुना पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी पाठवल्यानंतर ही बाब समोर आली आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेने केंद्राला ही बाब कळवल्यानंतर केंद्राचे आरोग्य पथक पालघर जिल्ह्यात दाखल झाले आहे पुढे हे पथक आश्रम शाळा व इतर परिसरामध्ये जाऊन सर्वेक्षण करणार आहे. याच बरोबरीने त्या परिसरातील डासांचे नमुने घेऊन ते राष्ट्रीय जिवाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे माहिती आरोग्य विभागामार्फत दिली गेली आहे.
झिका पॉझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थ्याच्या सहवासात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे तसेच या परिसरामध्ये ज्यांना ताप येईल त्या सर्वांची सॅम्पल कलेक्ट केली जाणार आहे. दररोज विद्यार्थ्यांना देखरेखी खाली ठेवण्यात येणार असून आरोग्य विभाग त्यांच्यावर जातीने लक्ष ठेवून आहे. ज्यांना ताप आला आहे अशांचे सॅम्पल पुणे येथे पाठवण्यात येतील परिसरातील गरोदर मातांना सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करून त्यांना सुरक्षित करण्यासाठी आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. आश्रम शाळेतील या विद्यार्थ्याला जी का विषाणूची लागण कशी झाली तो कुठून आला याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.
झाई आश्रम शाळेमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर या विद्यार्थिनी सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांना ताप, डोके दुखणे, मळमळणे असा त्रास जाणून आल्याने त्यांना डहाणूच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एकूण 13 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचे नमुने (swab) घेण्यात आले. त्यातील सात जणांचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे.या मधील एक विद्यार्थ्यांचा नमुना झिका विषाणू पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. झिकाची लागण झालेला विद्यार्थी हा सुखरूप असून त्याला उपचारार्थ ठेवण्यात आले आहे. तो आरोग्य पथकाच्या निगराणीखाली आहे. 2021 मध्ये पुणे येथे एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आता दुसरा रुग्ण पालघर मध्ये आढळून आला आहे.
झिका हा विषाणू डासांपासून पसरतो. हा गंभीर आजार असून तो डासांपासून इतरत्र पसरतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या तसेच तो वावर करत असलेल्या परिसराचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. याच बरोबरीने स्वाइन फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असून आरोग्य विभाग या परिसरात सर्वेक्षण करणार आहे. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन डास प्रतिबंधात्मक उपाय योजना व कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.