वसई तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी दिवाणमान येथील सर्व्हे नं. १७६ मधील सर्वधर्मीय कब्रस्तान /दफनभूमी, ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, महापालिकेची स्वतःची परीवहन सेवा आणि एसटी महामंडळाची परिवहन सेवासुरळीत व्हावी, आयआयटी आणि निरी यांनी दिलेल्या अहवालानुसार धारण तलाव (Holding Ponds) व इतर सुचवलेल्या उपाययोजनांची अमलबजावणी व्हावी यासाठी आत्तापर्यंत केलेल्या “आमरण उपोषण” दरम्यान महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या लेखी आश्वासनामुळे उपोषण स्थगित करण्यात आले होते. परंतु वेळेत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने “स्थगित आमरण उपोषण” पुन्हा महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातच सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी दिला आहे. आज (दि.१०) समीर वर्तक त्यांच्या शिष्ठमंडळासह वसई विरार पालिका मुख्यालयात आयुक्त गंगाथरन डी. यांच्या भेटीला पोहचले. आयुक्तांच्या दालनात चर्चा होत असताना धीरगंभीर झालेले आयुक्त अचानक उठले आणि तुमच्या कोणत्याही मागण्या मान्य होणार नाहीत असे तडकाफडकी बोलून समीर वर्तकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी बाहेर काढा असा आदेश सुरक्षा रक्षकांना देऊन आपल्या दालनातून तडक निघून गेले असे समीर वर्तक यांनी सांगितले. त्यामुळे वातावरण तापले होते.

मात्र कुणीही बाहेर जायला तयार नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. तरीही काही होईना अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांना त्यांच्या भेटीस आयुक्तांच्या दालनात यावं लागलं. त्यांनी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना मंत्रालयीन कामासाठी तातडीने जावे लागल्याने शिष्ठमंडळाशी चर्चा करता अली नाही अशी सारवासारव करत वरील मागण्यांबाबत दि. १७ डिसेंबर रोजी आयुक्तांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचे म्हणत तसे लेखी पत्र अति. आयुक्त देहेरकर यांनी समीर वर्तक यांना दिले. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या अचंबित करणाऱ्या वागणुकीवर पडदा पडला अशी माहिती समीर वर्तक यांनी दिली आहे. शिष्ठमंडळात समीर सुभाष वर्तक, अध्यक्ष, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सोबत सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे, पर्यावरण विभागाचे प्रदेश सचिव टोनी डाबरे, अम्मार पटेल आणि आमिर देशमुख, वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष डेरीक फुरटॅडो, काँग्रेस नेते हर्षद खंडागळे, तारिक खान आणि दर्शन राऊत यांचा समावेश होता. सामान्य नागरिकांच्या मूलभूत मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून प्रसंगी “आमरण उपोषणासारखे” आंदोलनही केले. परंतु महापालिका आयुक्तांनी त्याकडे सर्रास दुर्लक्ष करुन नागरिकांच्या जगण्या-मरण्याशी निगडित समस्यांची अवहेलना केली असल्याचे समीर वर्तक म्हणाले. शहरातील मुस्लिम, ख्रिश्चन तसेच लिंगायत या अल्पसंख्यांक समाजाच्या कब्रस्तान/दफनभूमीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

दि. २३ डिसेंबर २०२० रोजी सुरू केलेल्या “आमरण उपोषणा” च्या तिसऱ्या दिवशी लिखित स्वरूपात ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना जून २०२१ पर्यंत कार्यान्वित होईल असे कळविले होते. परंतु या योजनेचे काम आजतागायत चालूच झालेले नाही. अवैध मातीभराव व अनधिकृत बांधकामांमुळे मागील ५-६ वर्षांपासून सातत्याने बुडणारी वसई आणि भविष्यात वसई बुडू नये म्हणून महापालिकेने १२ कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या IIT आणि NEERI च्या अहवालाप्रमाणे धारण तलाव (Holding Ponds) आणि इतर उपाययोजनांची त्वरित अमलबजावणी करणे फार गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांचे प्रचंड नुकसान आणि हाल होणार आहेत असे म्हटले आहे. तरी वरील सर्व विषयांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा मागण्या पूर्ण न झाल्यास १५ ते २० दिवसांत पुन्हा स्थगित केलेले “आमरण उपोषणाचे” आंदोलन महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातच चालू करण्यात येईल असा गंभीर इशारा समीर वर्तक यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed