
मुंबई :- पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल, पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातील आक्षेप आणि शंकाच्या संदर्भात सह्याद्रीवर ही बैठक झाली. बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अखेरीस एस.एम.देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. “पत्रकार संरक्षण कायदा झाला पण कायद्याचं नोटिफिकेशन निघाले नसल्याने राज्यात कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची सूचना गृहसचिवांना केली.
पत्रकार सन्मान योजनेचे नियम अत्यंत जाचक असल्याने बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित आहेत. तेव्हा नियम शिथिल करण्याची मागणी एस.एम.देशमुख यांनी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यासंबंधीच्या सूचना संबंधीत अधिका-यांना दिल्या.