वसई : वसई-विरार महापालिकेने पत्रकारांच्या मालमत्ताकराची थकबाकी असल्याची चुकीची यादी प्रसिद्ध केल्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. बुधवारी पत्रकारांनी दोन तास पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्तांनी पत्रकारांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली आणि झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. वसई-विरारमधील पत्रकारांनी एकत्र येऊन आपल्या आत्मसन्मानाचा हा लढा यशस्वी करून दाखवला.

वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी दाखविणारी पत्रकारांची यादी प्रसिद्ध केली होती. ही यादी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. ज्या पत्रकारांनी मामलत्ता कराचा भरणा केला आहे त्यांची नावे त्यात होती. ज्या मालमत्ता पत्रकारांच्या नाही त्या देखील पत्रकारांच्या दाखविण्यात आली होती. त्यामुळे समाजात पत्रकारांबाबत चुकीचा संदेश गेला आणि बदनामी झाली होती. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी सर्व पत्रकारांनी पालिका मुख्यालयावर आंदोलन केले. सर्व पत्रकारांच्या संघटना, स्थानिक वृत्तपत्रे, युट्यूब चॅनेल्सचे पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुपारी १२ पासून हे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद केल्याने पत्रकारांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या आंदोलन केले. उपायुक्त (आस्थापना) सदानंद गुरव आणि उपायुक्त समीर भूमकर (कर) यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांच्या दालनात जाऊन चर्चा करण्याचा आग्रह केला. मात्र तो पत्रकारांनी फेटाळून लावला. जोपर्यंत आयुक्त वा तत्सम अधिकारी येत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कडक भूमिका पत्रकारांनी घेतली.

महापालिकेकडून दिलगिरी

अखेर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी खाली येऊन पत्रकारांशी चर्चा केली. ही यादी अधिकृतपणे प्रसारीत केली नसल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांची बदनामी करण्याचा उद्देश नाही तसेच महापालिका पत्रकारांच्या विरोधात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक कर संकलन व्हावे, यासाठी सर्वांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकारांच्या यादीत चुकीची माहिती गेली असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *