वसई-विरार: महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाच, आता पेल्हार येथील ‘विनोद इंडस्ट्रियल पार्क’मध्ये सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या (CUC) प्रमुख विशाखा मोडगरे मॅडम यांच्याकडे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. नियमांना तिलांजली देऊन सुरू असलेल्या या बांधकामामुळे शासकीय महसुलाचा मोठा चुराडा होत असल्याची गंभीर चर्चा परिसरात सुरू आहे.

पेल्हार परिसरातील विनोद इंडस्ट्रियल पार्क येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या बांधकामास महापालिकेची कोणतीही वैध परवानगी, मंजूर बांधकाम नकाशा किंवा कायदेशीर मंजुरी आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कागदावर काय आणि प्रत्यक्षात जमिनीवर काय, याची खातरमा जमा करण्यासाठी CUC विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता थेट घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करणे गरजेचे बनले आहे.

महसूल बुडण्याचा धोका आणि प्रशासनाचे मौन अशा अनधिकृत प्रकारांमुळे महापालिका आणि शासनाचा महसूल कोट्यवधी रुपयांनी बुडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ अनधिकृत बांधकाम पाडणे एवढेच नव्हे, तर संबंधित मालमत्तेची कसून चौकशी करून मालमत्ता कर, विकास शुल्क आणि इतर सर्व देणी वसुल करण्याची मागणी अर्जातून रेटण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात जर महापालिकेच्याच एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने हातमिळवणी केली असेल किंवा डोळेझाक केली असेल, तर अशा दोषींवरही कठोर शिस्तभंगाची कारवाई होणे गरजेचे आहे.

आता या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा कितपत सक्रिय होते आणि अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्ष कारवाईचातोफा कधी झडतात, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाठीशी घातले गेल्यास हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *