♦️पालिकेच्या स्थळ पाहणीत मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामं; कारवाई मात्र शून्य

♦️हरी शंकर जयस्वाल यांचे आजपासून पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण

वसई : (प्रतिनिधी) :

नालासोपारा पूर्वेतील गावमौजे मोरे येथील सर्व्हे क्रमांक 189, हिस्सा क्र.4/ए या भूखंडावरील बांधकामास वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम परवानगी क्रमांक (व्हीपी 5204) नुसार परवानगी दिली आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या स्थळ पाहणी तपासणीत विकासकाने मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अनधिकृत वाढीव बांधकामावर निष्कासनाची कारवाई करून विकासकावर एमआरटीपी तसेच फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पालिकेला अनेकदा तक्रारी देऊनही वसई विरार शहर महापालिकेचे कान हललेले नाहीत.  त्यामुळे हरी शंकर जयस्वाल हे तक्रारकर्ते  वसई विरार शहर महापालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
दरम्यान, एकूण 7 इमारतींच्या बांधकामासाठी विकासकांनी नगररचना विभागाकडून परवानगी घेतली आहे. मात्र त्यात अनधिकृत वाढीव बांधकाम झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी संबंधित विकासकास मुळ बांधकाम परवानगीपेक्षा जादा प्रमाणात केलेले अनधिकृत वाढीव बांधकाम स्व-खर्चाने पाडून टाकण्याचे आदेश एका एमआरटीपी नोटीसी अंतर्गत प्रभाग समिती ब, विरार पूर्व यांनी याआधीच दिले आहेत. तसेच पालिकेची फसवणूक करून बोगस कागदपत्रांच्या आधारे सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या विकासक चंद्रकांत जी. पाटील यांच्यासह नवदुर्गा डेव्हलपर्स दया एम.शर्मा आणि इतर यांच्यावर पालिकेची दिशाभूल केली तसेच पालिकेच्या महसुलाची चोरी केली म्हणून एमआरटीपी अधिनियम अंतर्गत 52, 53, 54 व 55 नुसार तसेच फौजदारी कायदा कलम 420, 34 अन्वये कारवाई करून  सदर अनधिकृत वाढीव बांधकाम तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश आपण प्रभाग समिती ‌‘ब‌’ प्रभारी साहाय्यक आयुक्त यांना द्यावेत. अशी मागणी व तक्रार तक्रारकर्ते हरी शंकर जयस्वाल यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. मात्र पालिकेने या तक्रारीलाच केराची टोपली दाखवली आहे.
त्यामुळे तक्रारकर्ते हरी शंकर आज पालिकेच्या उदासीन व बेजबाबदार कारभाराचा बुरखा फाडण्यासाठी व पालिका व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पालिका प्रशासनाच्या विरार येथील मुख्यालयासमोर  उपोषणाला बसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *