
केअर अँड क्युअर रुग्णालयावर स्टिंग ऑपरेशन; तिघांविरोधात गुन्हा दाखल
नालासोपारा, २२ जानेवारी :
वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने नालासोपारा पूर्व येथील केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचा पर्दाफाश करत संबंधितांवर कारवाई केली आहे. वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती अधिनियम, १९७१ अंतर्गत आवश्यक परवाना व अधिकृतता नसताना गर्भपाताची औषधे दिल्याप्रकरणी तिघांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला सदर रुग्णालयात अवैधरित्या गर्भपात केल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.), अतिरिक्त आयुक्त (वैद्यकीय आरोग्य) दिपक सावंत व उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य) स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही करण्यात आली.
दि. २२ जानेवारी रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पांढरे व डॉ. कृष्णा गोसावी यांनी स्टिंग ऑपरेशन करत तपासणी केली. तपासात केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (कामधेनू सीएचएस, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व) येथे वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती अधिनियमाचे उल्लंघन करत, आवश्यक परवाना नसताना व शैक्षणिक अर्हता नसताना रुग्णांना गर्भपाताची औषधे दिली जात असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रकांत शंभुनाथ मिश्रा, अरुण शुक्ला तसेच वालईपाडा येथील कुशल क्लिनिकचे डॉ. संजीव सिंग हे दोषी आढळून आले. यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आचोळे पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला.
दरम्यान, वसई–विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रात बेकायदेशीर पीसीपीएनडीटी केंद्रे, गर्भलिंग निदान व अवैध एमटीपी केंद्रांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडे किंवा आमची मुलगी संकेतस्थळ (www.amchimulgimaha.in) तसेच टोलफ्री हेल्पलाईन क्रमांक १८००-२३३-४४७५ आणि १०४ वर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची गोपनीयता राखली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले आहे
