वसई: वसई-विरार पट्ट्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘आर्ट कॉर्नर अकादमी’च्या वतीने आनंद नगर, वसई (पश्चिम) येथे स्टेशनलगत ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या प्रदर्शनाला रसिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हाताने तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

या प्रदर्शनाचे आयोजन अकादमीच्या विभावरी देसाई यांनी केले असून, यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी स्वरा शेट्ये आणि यश्मित अमीन यांनी विशेष योगदान दिले आहे. प्रदर्शनात हस्तकलेच्या विविध वस्तू, राख्या, रेझिन क्राफ्ट, सुगंधी मेणबत्त्या आणि आकर्षक पेंटिंग्सचा समावेश आहे.

दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले. यामध्ये आयझॅक न्यूटन शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया डाबरे, सफाळे येथील फॅशन डिझायनर स्नेहा गोरे, डॉ. वरुण शिरीषकर, आणि ॲड. रुचिता सामंत यांचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय, स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही भेट देऊन कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन दिले.

कलाकारांना हक्काचे व्यासपीठ
अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे हातावर पोट असलेल्या आणि कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना बाजारपेठ उपलब्ध होते. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सामाजिक शिस्त पाळून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *