
पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमए’तर्फे मेगा हेल्थ कॅम्प संपन्न; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
नालासोरापा ( प्रतिनिधी):
नालासोरापा मेडिकल असोसिएशनच्या (एनएमए) वतीने पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कामवण येथील प्राथमिक व अप्पासाहेब धामणे माध्यमिक आश्रम शाळेमध्ये नुकताच एका भव्य आरोग्य शिबिराचे (मेगा हेल्थ कॅम्प २०२६) आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये ७०० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. दुर्गम आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने राबव Rबवलेल्या या उपक्रमात ६० हून अधिक डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली सेवा दिली.
रक्त तपासणीवर विशेष भर या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची विशेष रक्त तपासणी ठरली. शिबिरादरम्यान सर्व ७०० विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिनची (Hb) तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २८० विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन ११ ग्रॅम प्रतिडेसिलिटरपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले.
या विद्यार्थ्यांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी सर्व २८० विद्यार्थ्यांच्या सीबीसी (CBC) चाचण्या करण्यात आल्या. या मुलांना विशेष वैद्यकीय मार्गदर्शन, तीन महिन्यांची आवश्यक औषधोपचार तसेच नियमित पाठपुराव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासी व दुर्गम भागातील मुलांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शिबिरानंतरही त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाणार असल्याचे ‘टीम एनएमए नेक्सस’तर्फे स्पष्ट करण्यात आले.
विविध आरोग्य उपक्रमांचा समावेश
या शिबिरात सर्वसमावेशक आरोग्य सेवांवर भर देण्यात आला होता. यात प्रामुख्याने:
सामान्य आरोग्य तपासणी (जनरल चेक-अप)
डोळे व दंत तपासणी
हिमोग्लोबिन स्क्रिनिंग व सीबीसी चाचणी
मोफत औषधोपचार व पौष्टिक आहार साहाय्य
मासिक पाळी स्वच्छताविषयक जनजागृती
विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य व शैक्षणिक आरोग्य साहित्याचे वाटप
‘निरोगी मुले, बळकट शाळा, उज्वल समुदाय आणि एक सुदृढ उद्या’ या उद्देशाने पार पडलेल्या या यशस्वी शिबिरासाठी सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, दाते आणि योगदानकर्त्यांचे आयोजकांतर्फे मनापासून आभार मानण्यात आले.
