Oplus_131072

वॉर्ड १९ मधील धक्कादायक वास्तव; ३-४ महिन्यांपासून नागरिक त्रस्त

– मानवाधिकार मिशनचा प्रशासनाला दप्तर दिरंगाई कायद्याचा इशारा

​

​वसई-विरार:

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९ अंतर्गत येणाऱ्या नवजीवन वसाहतीत (गुलमोहर अपार्टमेंटजवळ) चेंबर तुटल्यामुळे गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून शौचालयाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत आहे. विशेष म्हणजे, याच दूषित पाण्याच्या थारोळ्यातून शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून वाट काढत ये-जा करावी लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

​साथीच्या आजारांचे सावट

​गेल्या काही महिनмаंपासून सांडपाणी रस्त्यावर साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांचा उपद्रव वाढला आहे. परिणामी, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या जीवघेण्या साथीच्या आजारांचा मोठा धोका परिसरातील नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर ओढवला आहे. स्थानिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या. मात्र, कागदी घोडे नाचवण्याशिवाय प्रशासनाने प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

​दप्तर दिरंगाई कायद्याचा बडगा उगारण्याचा इशारा

​या संपूर्ण प्रकरणावर मानवाधिकार मिशनचे तालुकाध्यक्ष किशोर मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आणि आरोग्यावर होत असलेला हा घाला खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. कायदेशीर चौकटीत राहून, ‘दप्तर दिरंगाई कायदा २००६’ अंतर्गत या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि कर्तव्यकडक बजावण्यात अपयशी ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

​नागरिकांचा आक्रमक पवित्रा

​स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या या उदासीन भूमिकेमुळे ‘आम्ही जगायचे कसे?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. निवडणुकांच्या वेळी मतांसाठी दारी येणारे नेते आणि अधिकारी आज समस्या बिकट झाल्यावर मूग गिळून गप्प का बसले आहेत, असा जाब नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने या समूळ समस्येची दखल घेऊन सांडपाण्याची निचरा व्यवस्था सुरळीत न केल्यास, नागरिकांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *