यु.ए. वृत्तसेवा, वसई

नायगाव रेल्वे स्थानकावर ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नायगावसह परिसरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सदस्या ॲड. दीप्ती चेतन भोईर यांनी केली आहे.

या संदर्भात ॲड. भोईर यांनी शुक्रवारी (दि. १३) वसई रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन लेखी निवेदन सादर केले. घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, तसेच संबंधितांचे जबाब नोंदवून दोषींविरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलावीत, असे या निवेदनात म्हटले आहे.

रेल्वे स्थानक परिसरात महिला प्रवाशांना निर्भयपणे प्रवास करता आला पाहिजे. अशा घटना घडणे अत्यंत चिंताजनक असून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. स्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवून आवश्यक तिथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी ॲड. भोईर यांनी केली. तसेच, पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वतोपरी कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

निवेदन देतेवेळी नगरसेविका रंजन थालेकर, सुवर्णा पाटील, मार्शलिन चाको, ज्योती म्हात्रे, महिला कार्यकर्त्या शबनम आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *