

मुंबई दि. २६ जून – साध्वी प्रज्ञासिंग हिचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये चक्क शहीद हेमंत करकरे यांच्या पोलिस वेशभूषेत ‘प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंधश्रद्धा मी देशासाठी शहीद झालो’ अशा आशयाचे बॅनर हातात घेवून विधानभवनात आज दाखल झाले.
आमदार प्रकाश गजभिये यांच्या या वेगळ्या आंदोलनाने सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिसही चक्रावून गेले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी माझा छळ केला. मी दिलेल्या शापाने त्यांचा मृत्यू झाला असे निंदनीय वक्तव्य करून प्रज्ञासिंग ठाकुर हिने देशाचा व शहीदांचा अपमान केला होता त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी हे अनोखे आंदोलन केले.
आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी सामाजिक प्रश्नांवर अधिवेशन काळात आंदोलन करतात. त्यांनी यापुर्वी संत तुकाराम, सरकारला कंटाळलेला शेतकरी, संभाजी भिडे यांचे मुलं होणारे आंबे विकून आणि आता शहीद हेमंत करकरे यांच्या वेशभूषेत येवून साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर हिचा निषेध केला. अशा अनोख्या वेशभूषा साकारुन सरकारचे लक्ष वेधले होते. शिवाय त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चाही झाली होती