मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी त्यांची बदनामी करणारे वृत्त प्रसारीत केले म्हणून विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीने (हक्कभंग) न्युज-१८ लोकमत या मराठी वृत्तवाहीनीला दोषी ठरवत चॅनलने बिनशर्त माफीनामा मागावा असे आदेश दिले आहेत.

सदर वृत्त दाखविल्या प्रकरणी तत्कालीन संपादक प्रसाद काथे, तत्कालीन वार्ताहर प्राजक्ता पोळ शिंदे, वृत्त निवेदक विलास बडे यांनाही समितीने दोषी ठरविले आहे.समितीसमोर त्यांनी लेखी माफी मागितल्यामुळे यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी त्यांना समजही देण्यात आला आहे. न्युज-१८ या मराठी वृत्तवाहीनीचे संपादक,वार्ताहर व सुत्रसंचालक यांनी या वृत्तवाहीनीच्या २८ फेब्रुवारी, २०१८ रोजी महागौप्यस्फोट या मथळ्याखाली प्रसिध्द केलेल्या बातमीसाठी विधान परिषदेच्या कार्यवाहीचा भाग झालेल्या लक्षवेधी सुचनेची प्रत अवैधरित्या प्राप्त करुन ती बेकायदेशीरपणे वृत्तवाहीनीवर प्रसारीत करुन त्यासंदर्भातील कार्यवाहीची अधिकृत व खात्रीशीर माहिती न घेता, माहितीची सत्यता न तपासता विधान मंडळ सदस्यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या संसदीय कामकाजाबाबत व कर्तव्यांबाबत अत्यंत आक्षेपार्हपणे विधान परिषदेच्या कार्यवाहीचा विपर्यास करणारे पुर्णत: असत्य व तथ्यहीन वृत्त वृत्त वाहीनीवर जाणीवपुर्वक प्रसारीत करुन त्याव्दारे विधानमंडळाची प्रतिष्ठा व सन्मान यांना हानी पोहचवून विधानमंडळाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याने सदर हक्कभंग प्रकरण आमदार हेमंत टकले यांनी दाखल केले होते.

या प्रकरणात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव, अनंत कळसे, आमदार आनंद ठाकूर यांची बदनामी करण्यात आली होती.सदर प्रकरण सभापतींनी दाखल करुन घेत हक्कभंग समितीकडे दिनांक १ मार्च, २०१८ रोजी सादर केल्यानंतर समितीने त्याच्या २३ बैठका घेतल्या. संबंधितांचे साक्षीपुरावे नोंदवून त्यासंदर्भातला अहवाल काल विधानपरिषदेत समितीचे सदस्य आमदार गिरीश व्यास यांनी सादर केला.

न्युज-१८ लोकमत या वृत्तवाहीनीने लिखित स्वरुपात तसेच समितीसमोर व्यक्तीश: सादर केलेली बिनशर्त माफी सभागृहाने औदार्याने स्विकारावी व ज्या दिवशी समितीचा हा अहवाल विधानपरिषद विचारात घेऊन स्विकारेल त्याच दिवशी संबंधित वाहीनीने म्हणजे न्युज-१८ लोकमत व नेटवर्क-१८ या वृत्तवाहीन्यांची संयुक्त वाहीनी असलेल्या न्युज-१८ लोकमतच्या वृत्त वाहीनीवर या वाहीनीच्या प्रतिनिधींनी समितीसमोर कबूल केल्यानुसार न्युज-१८ लोकमत या वृत्तवाहीनीचा बिनशर्त माफीनामा मराठी व इंग्रजी भाषेतून ठळक पध्दतीने ग्राफीक्स प्लेट्सवर सायंकाळी ७ ते रात्रौ १० या प्राईम टाईम मध्ये वारंवार प्रसिध्द करावा व या प्रक्षेपणाची सिडी समितीला सादर करावी असे आदेश दिले आहेत.ज्यावेळी कोणत्याही व्यक्तीवर किंवा लोकप्रतिनिधीवर वृत्तवाहीनी जाहीरपणे आरोप केले जातात त्यावेळी त्या आरोपांची खातरजमा करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: लोकप्रतिनिधींवर आरोप करतांना त्यांचे म्हणने नोंदवून त्याची खात्री करुनच त्यांच्या अनुमतीने बातमीमध्ये प्रसारण करणे उचित ठरेल. सर्व वृत्त वाहीन्यांनी अशा प्रकारच्या बातम्या देतांना काही निश्चित अशी मार्गदर्शक तत्व संहिता स्वत:साठी निर्माण करावी असेही समितीने सुचविले असून वृत्त वाहीन्यांनी विधानमंडळाचे कामकाज व विशेषाधिकार याबाबत अधिक सजग व्हावे असे सुचविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *