
समाजसेवक मनोहर गुप्ता यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस
प्रतिनिधी
वसई- पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे वसईतील एका समाजसेवकाला नाहक बेमुदत आमरण उपोषण पुकारावे लागले आहे. तक्रारी असतानाही बेकायदेशीर फेरफार नोंद करणारे मंडळ अधिकारी शशिकांत पड़वळे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीकरता समाजसेवक मनोहर गुप्ता यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे.
गुप्ता यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून; पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकारी आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने मनोहर गुप्ता यांनी आपल्या निर्णयावर कायम राहण्याचा निर्धार केला आहे.
वसई तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून मनोहर गुप्ता बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शशिकांत पड़वळे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व फेरफरांची चौकशी करावी, चौकशी होईपर्यंत त्यांचा पदभार काढून घ्या आदी मागणी केल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
वसई-पोमण येथील सर्व्हे क्रमांक-१८०/१ व १७९ या जमीन मिळकतीत बिनशेती फेरफार मंजूर करण्याकरता हरकत घेण्यात आली होती. याबाबत मंडळ अधिकारी यांना पुरावे सादर करण्यात आले होते. त्यानंतरही मंडळ अधिकारी यांनी फेरफार क्रमांक-२६७२ व २६८५ मंजूर करून घेतले, असल्याची मनोहर गुप्ता यांची तक्रार आहे.
दरम्यान; मौजे कामण येथील सर्व्हे क्रमांक ६२/१ या जमीन मिळकतीत तहसीलदार वसई यांचेकडील २१ फ़ेब्रुवारी अन्वये ९,३६००० रुपयांचा गौण खनिज बोजा असताना तो वसूल न करता मंडळ अधिकारी यांनी जमीन खरेदीचे दोन फेरफार मंजूर करून घेतले असल्याचे मनोहर गुप्ता यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे जमीन खरेदीदार हे शेतकरी नसून बांगलादेशी आहेत. तक्रारी प्रलंबित फेरफार असताना तक्रार रजिस्टर न भरता व तो रद्द न करता नव्याने दुसरा फेरफार मंजूर करत असल्याचेही गुप्ता यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात, महसूल सचिव व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
या अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही; तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरुच राहणार असल्याचे समाजसेवक मनोहर गुप्ता यांचे म्हणणे आहे.
दरम्यान; पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरुसळ यांनी आपल्या या आदेशांवरील भूमिका स्पष्ट केलेली नाही. विशेष म्हणजे वसई तहसील कार्यालयातील तहसीलदार-नायब तहसीलदार यांनीही समाजसेवक मनोहर गुप्ता यांचे म्हणणे ऐकून किंवा त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मनोहर गुप्ता यांचे उपोषण सुरुच आहे.
शशिकांत पड़वळे, मंडळ अधिकारी म्हणतात…..!
फेरफार करुन घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश होते. त्यामुळे त्यांच्या आदेशांचे पालन करणे माझे काम आहे. फेरफारमध्ये काही चूक असेल तर तसे आदेश मला जिल्हाधिकारी देतील.