
प्रतिनिधी, वसई- करोनाच्या काळात शहरातील बंद असलेल्या उद्यानांची देखभाल दुरूस्ती न झाल्याने त्यांची अवस्था बकाल झाली आहे. उद्यानातील साहित्यांना गंज लागला असून ती मोडकळीस आली आहेत. उद्यानात कचर्याचे साम्राज्य पसरलेले असून अनेक साहित्यांची चोरी झालेली आहे. यामुळे उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे.
वसई विरार शहरात महानगरपालिकेची एकूण १३५ उद्याने आहेत. पालिकेने लाखो रुपये खर्च करून उद्यानांचे सुशोभीकर केले होते. त्यात लहान मुलांची खेळण्याचे साहित्य, व्यायामाचे साहित्य, बसण्यासाठी बाके ठेवण्यात आली होती. उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीचा ठेका महिला बचत गटांना देण्यात आला होता.मागील वर्षी मार्च २०२० मध्ये करोनाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर उद्याने नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. करोनाच्या दुसर्या लाटेचे निर्बंध शिथील झाल्यानंतर उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली. मात्र या उद्यानांची देखभाल दुरूस्ती न झाल्याने शहरातील बहुतांश उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे.
नालासोपारा पूर्व सेंट्रलपार्क, सनशाईन गार्डन, आचोळे तलाव, मोरेगाव तलाव, नालासोपारा पश्चिम फनफिस्टा गार्डन, महेश पार्क, मनवेलपाडा, पापड़ी, तामतलाव, भास्कर आळी, गोखिवरे, मानांचली, बालीय, धानिबवाग, बोळींज, छेडानगर या उद्यानांची अवस्था अधिक खराब झाली आहे. लहान मुलांच्या खेळण्याची, व्यायामाची साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची बाके मोडकळीस आली आहे. त्यांना ठिकठिकणी गंज लागला आहे. कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी गवत, झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे सरपटणार्या प्राण्याचा वावर वाढला आहे. बहुतेक उद्यानातील दिवे बंद , सुरक्षा यंत्रणा नसल्याने साहित्य चोरीस गेले आहे. तसेच मध्यरात्रीच्या वेळी मद्यपी धुडगूस घालत आहे.
या उद्यांनांच्या देखभाल दुरूस्तीचा ठेका महिला बचत गटांना देण्यात आला होता. मात्र त्यांनी उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्याचा आरोप वसई युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुलदिप वर्तक यांनी केला आहे. या उद्यानात येणारी मुले, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. उद्यानाची बकाल अवस्था झाल्याने अनेकजण उद्यानात येण्याचे टाळत आहेत. या उद्यानांची त्वरीत दुरूस्ती करावी आणि उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीसाठी अपयशी ठरलेल्या महिला बचत गटांवर कारवाई करावी अशी मागणी कुलदीप वर्तक यांनी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.