वसई, दि. २० (प्रतिनिधी) : भोईदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर ८ दिवसांत उपाय झाले नाहीत, तर नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वसई-विरार महापालिकेचा हजार

टन कचरा वसई पूर्वेतील भोईदापाडा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. परंतु या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया होत नाही. त्यामुळे परिसरात भयानक दुर्गंधी पसरली आहे. या संदर्भात कै. वसंत वैती आणि कै. वामन शेळके यांनी मनपाला वारंवार पत्र दिले. पण मनपाने फक्त आश्वासन दिले, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे भोईदापाडा आणि आजूबाजूच्या गावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

महापालिकेचा हा हलगर्जीपणा पाहून भोईदापाडा संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. समितीचे उपाध्यक्ष विश्वास किणी, सचिव काकासाहेब मोटे, कोषाध्यक्ष शांताराम पुसेकर आणि मार्गदर्शक अशोक बंडे यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन आंदोलनावर सहमती घेतली. समितीचा निर्णय असा आहे की, जर मनपाने ८ दिवसांत उपाय केले नाहीत, तर गावकरी कचरा वाहणाऱ्या गाड्या थांबवतील.

महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांना समितीने निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, डम्पिंग

ग्राउंडमधून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना आजार होतात. पावसाळ्यात ही समस्या फार वाढते. कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून

रस्त्यावर कचरा पडतो आणि रस्तेही कचऱ्याने भरतात. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी व कचरा साचतो. त्यामुळे दुर्गंधी आणखी वाढते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो.

भोईदापाडा-नायगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. वर्षानुवर्षे ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांकडून लेखी तक्रारी करूनही महापालिकेने काहीच ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *