
पुणे | प्रतिनिधी
जैन धर्मातील पवित्र आणि धार्मिक विधींपैकी एक असलेली स्नात्र पूजा नुकतीच पुणे चंदननगर येथे अत्यंत श्रद्धा आणि भक्तीभावाने पार पडली. ही पूजा तीर्थंकरांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मोक्षप्राप्तीचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. यामध्ये तीर्थंकरांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो तसेच त्यांचे गुणगान गायले जाते.
चंदननगर श्वेतांबर मूर्ती पूजक संघाच्या नूतन जैन मंदिर निर्माण कार्यानिमित्त या स्नात्र पूजेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. पूजेमध्ये दीपक पूजा, अक्षत पूजा, पुरुषोत्तम पूजा यासह विविध धार्मिक विधी पार पडले.
या पवित्र पूजेसाठी संघाचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल बोरा, उपाध्यक्ष अभिजीत मोहनभाई शहा, सेक्रेटरी परेश कटारिया, खजिनदार प्रवीण संघवी, किरणकुमार कटारिया, सुजल शहा, पार्श्व (सुरज) शहा, कुंदनमल घिसुलाल परमार आदी मान्यवर उपस्थित होते.
पूजेचा संपूर्ण माहोल भक्तीमय व सात्विकतेने परिपूर्ण होता. नवनिर्मित मंदिराच्या कार्यास बळ देणारी ही पूजा संघाच्या एकजुटीचे प्रतीक ठरली.
