
हल्लेखोर स्वप्नील नर आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाईची मागणी
वार्ताहर
वसई : बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पूर्ववैमनस्यातून भाजपचे माजी बोईसर विधानसभा विस्तारक प्रतीक चौधरी यांच्यावर मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी दुपारी जीवघेणा हल्ला केला. वसई-सागरशेत पेट्रोलपंपवर बेसावध क्षणी अचानक गाठून केलेल्या या हल्ल्यात प्रतीक चौधरी जखमी झाले आहेत. तर हल्लेखोर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याचे नाव स्वप्नील नर असे आहे.
विविध माध्यमांतून प्रतीक चौधरी हे आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. अनेकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी केलेली कामे, राबवलेल्या योजना आणि त्यांची मते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ही भूमिका मान्य नसलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अनेकदा टीका केली जाते. या टीकेला ते देत असलेल्या प्रत्त्युतराच्या रोषातूनच त्यांच्यावर स्वप्नील नर, सरोज खान, दाऊद आणि अन्य चार ते पाच जणांनी रस्त्यात गाठून हल्ला केला असल्याचे प्रतीक चौधरी यांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात चौधरी यांच्या नाक आणि अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर वसईतील डी.एम.पेटीट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान; स्वप्नील नर, सरोज खान, दाऊद आणि अन्य चार ते पाच जणांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेतल्याने या सर्वांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रतीक चौधरी यांनी केली आहे. स्वप्नील नर हे पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात होते. त्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केलेला आहे. वसईतील हृषिद दवे, उमेश केंकरे आणि स्वप्नील नर हे व्यावसायिक भागीदार असल्याचे सांगितले जाते. अनधिकृत बांधकामांच्या झेड झेड फंड वसुलीत अनेकदा हृषिद दवे यांचे नाव पुढे आलेले आहे. स्वप्नील नर हे बहुतांश वेळा त्यांच्याच कार्यालयात बसलेले असतात. त्यामुळे हा कट त्यांच्याच कार्यालयात शिजला असावा, असा संशय प्रतीक चौधरी यांनी व्यक्त करत त्यांच्याही चौकशीची मागणी केली आहे. याच राजकीय दादागिरीच्या जोरावर स्वप्नील नर यांनी वसई-विरार महापालिकेची परवानगी धुडकावून वसई-स्टेला येथे खाऊगल्लीउभारली होती. त्यावेळीही ते वादात सापडलेले होते.