मिठी नदी घोटाळ्यात अडकलेला शेरसिंग राठोड VVCMC ठेक्यातही सक्रिय; भ्रष्टाचाराचे जाळे उघड

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या तब्बल ६५.५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक झालेला कंत्राटदार शेरसिंग राठोड (४९, बोरीवली निवासी) हा केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून वसई-विरार महानगरपालिकेच्या (VVCMC) घनकचरा व्यवस्थापन ठेक्यातही त्याचा मोठा हस्तक्षेप असल्याचे समोर आले आहे. राठोड याची मंदीप एंटरप्रायझेस ही फर्म सध्या VVCMC मध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम करत असून, येथेही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व गैरव्यवहार चालू असल्याचे उघड झाले आहे.

नागरिकांचा थेट सवाल असा आहे की, राठोडला ED कडून अटक झाल्यानंतरही त्याच्या फर्मला VVCMC मधून ब्लॅकलिस्ट का करण्यात आलेले नाही? एवढेच नव्हे तर ED ला राठोडच्या VVCMC मधील ठेक्यांची माहिती आहे का? अथवा या ठेक्यांमधील भ्रष्टाचाराचे धागेदोरे अजूनपर्यंत का सापडले नाहीत? असा सरळ प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

मजुरांच्या ठेक्यात गोंधळ

सदर ठेका हा केवळ मजुरांचा असूनही, त्यात वाहन चालक आणि मुकादमांचा समावेश करण्यात आला आहे. ठेक्यानुसार आवश्यक मजुरांची संख्या जाणीवपूर्वक कमी दाखवली गेली असून, त्याऐवजी राठोड यांचे ऑफिस स्टाफ, घरातील सदस्य आणि मित्रमंडळी मुकादम व वाहन चालक म्हणून दाखल करण्यात आले आहेत.

फेस बायोमेट्रिक हजेरी बंद

फसवणुकीसाठी राठोड आणि त्याच्या फर्मकडून फेस बायोमेट्रिक हजेरी प्रणाली जाणूनबुजून बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्ष किती मजूर कामावर हजर राहतात आणि किती कालावधीसाठी काम करतात, याचा ताळमेळ लागत नाही. परिणामी, हजेरी नोंदींमध्ये मोठा फेरफार करून महापालिकेला चुकीचे बिल सादर करण्यात येत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

कचऱ्याचे काम बाजूला, खासगी धंदा जोमात

नागरिकांच्या तक्रारीनुसार, ठेकेदार राठोड हा दैनंदिन कचरा उचलण्याचे महत्त्वाचे काम बाजूला ठेवून इंडस्ट्रियल कचरा आणि C&D (कन्स्ट्रक्शन व डिमॉलिशन) वेस्ट उचलण्यात व्यस्त असतो. या कामासाठी महापालिकेच्या मजुरांचा वापर, वाहने आणि डिझेलचा वापर केला जातो आणि या कामातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत कमाई केली जाते.

एवढेच नव्हे तर या कचऱ्याच्या उचलकामासाठी ठेकेदार आणि आरोग्य निरीक्षक यांच्याकडून मजुरांवर जबरदस्ती केली जाते.

मजुरांच्या जीविताला धोका

या सर्व प्रक्रियेमुळे मजुरांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. औद्योगिक कचऱ्यात रासायनिक वा घातक पदार्थ असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मजुरांच्या जीवितास काही धोका झाला तरी ना ठेकेदार, ना VVCMC कडून कोणतीही सुरक्षा तरतूद केलेली नाही. त्यामुळे कामगारांच्या जिवाशी खेळ चालू असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

फक्त राठोड नाही, सर्व ठेकेदार यात सामील

सदर गैरप्रकार फक्त राठोड यांच्याकडून केला जातो असे नाही, तर हा प्रकार VVCMC मधील सर्व घनकचरा ठेकेदारांकडून केला जातो. VVCMC मध्ये एकूण ०९ विभाग आणि २० झोन असून त्यासाठी १० ठेकेदार कार्यरत आहेत. या सर्व ठेकेदारांकडून अशाच प्रकारचे गैरव्यवहार चालू असल्याचे समोर येत आहे.

तसेच, वारंवार आणि अनेक वर्षांपासून त्याच ठेकेदारांनाच कंत्राटे कशी काय मिळतात? या प्रश्नावरून ठेकेदार आणि VVCMC अधिकारी यांच्यामध्ये संगनमत असल्याची शक्यता असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

पुरावे VVCMC समोर; तरीही कारवाई नाही

नुकतेच वाळीव विभागातील ठेकेदार हे आपले कचरा उचलण्याचे मूळ काम बाजूला ठेवून इंडस्ट्रियल कचरा उचलत असल्याचे पुरावे आणि व्हिडिओ ‘युवाशक्ती एक्सप्रेस’ या वृत्तपत्राद्वारे VVCMC समोर सादर करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

तसेच, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘नवराष्ट्र’ आणि ‘पुण्यानगरी’ सारख्या मोठ्या वृत्तपत्रांतही VVCMC च्या घनकचरा ठेक्यातील भ्रष्टाचारावर सविस्तर बातमी प्रकाशित झाली होती. तरीदेखील या ठेकेदारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, इतकेच नव्हे तर त्यांना साधी नोटीससुद्धा देण्यात आलेली नाही.

याव्यतिरिक्त, ११ सप्टेंबर २०२५ रोजी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या जनता दरबारात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. परंतु, तरीदेखील कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नागरिकांचा सवाल – VVCMC अधिकाऱ्यांचे संगनमत?

या सर्व प्रकरणामुळे VVCMC ची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन होत असून, कारवाईचा अभाव नागरिकांना चटका लावणारा आहे.

“जर इतके पुरावे, बातम्या आणि थेट मंत्र्यांच्या जनता दरबारात मुद्दा मांडल्यानंतरसुद्धा ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नसेल, तर याचा अर्थ असा की या गैरव्यवहारात VVCMC चे घनकचरा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि सर्व विभागांचे आरोग्य निरीक्षक देखील सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा थेट सवाल नागरिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *