





मुंबई | प्रतिनिधी
आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक संघर्ष आठवत, आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत लोकशाहीचे मूल्य जपण्याचा निर्धार विविध समाजवादी संघटनांनी केला. मुंबई लेबर युनियनच्या पुढाकाराने आणि के. सी. कॉलेज, चर्चगेट येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकाऱ्यांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण करून सांगितले, “देश संसदीय लोकशाहीसाठी बांधील आहे आणि त्याच्या रक्षणासाठी कोणतीही किंमत लागली, तरी ती देण्यास आम्ही तयार आहोत.”
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजवादी नेते कपिल पाटील होते. त्यांनी भाषणात स्पष्टपणे सांगितले की, “सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे कष्टकरी कामगारांच्या हक्कांचा संहार होत आहे. अशा धोरणांविरोधात संघटना एकत्र येऊन संघर्ष करतील.”
कार्यक्रमात आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेले जॉर्ज फर्नांडिस यांचे लढाऊ सहकारी — सुभाष मळगी, पद्मनाभ शेट्टी, विजय नारायण सिंह, मोतीलाल कनोजिया, देवी गुजर, शंकर साळवी, शंकर शेट्टी, फेड्रिक डिसा, संजीव पुजारी, सुरेश ठाकूर यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांतील कामगार चळवळीतील दिग्गज सहभागी झाले होते. विश्वास काटकर, अनिल हेगडे, अशोक जाधव, वामन काविस्कर, रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, हनुमंत ताटे, अशोक बेलसरे, नवनाथ गेंड, मधू बिरमोळे, शिवाजी खांडेकर, पी. व्ही. फडतरे, प्रफुल्ल म्हात्रे, रमेश भुतेकर, राजेंद्र सिंह हे सामाजिक कार्यकर्ते आणि नेते या वेळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन छात्र भारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणीबाणीतील इतिहास जिवंत ठेवत लोकशाही, श्रमिक हक्क, आणि समाजवादी मूल्ये पुन्हा एकदा उजळून निघाली.
