ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणा बंद; डॉक्टर अन् रुग्ण उकाड्याने त्रस्त

वसई: महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचे दावे कागदावरच फोल ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. वसई येथील महापालिकेच्या ‘सर डी. एम. पेटिट’ रुग्णालयातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या ऑपरेशन थिएटर (OT) मधील वातानुकूलित (AC) यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे. परिणामी, जीव धोक्यात घालून उपचार घेणारे रुग्ण आणि घामाघूम होत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.एका बाजूला पालिकेच्या तिजोरीतून आरोग्य सुविधांच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्ष रुग्णालयांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. ऑपरेशन थिएटरसारख्या अत्यंत निर्जंतुक आणि नियंत्रित तापमान आवश्यक असलेल्या भागात एसी बंद पडणे, हा थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. उकाड्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना आणि रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.या गंभीर प्रकाराबाबत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयातील यंत्रणा कोलमडली असतानाही प्रशासकीय पातळीवरून कोणतीही ठोस कारवाई किंवा दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या या अनास्थेमुळे आणि दुर्लक्षामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत असून, प्रभावी प्रशासनाला यामुळे मोठी चपराक बसली आहे.

“शस्त्रक्रियागृहात एसी बंद असणे हा वैद्यकीय निकषांनुसार अत्यंत गंभीर दोष आहे. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन यंत्रणा पूर्ववत न केल्यास तीव्र स्वरूपाचे कायदेशीर आणि जनक्षोभाचे आंदोलन छेडण्यात येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *