युवाशक्ती एक्सप्रेस प्रतिनिधी – ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला आणि विशेषतः विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी वसई तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे बिगुल वाजले आहे. ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत तालुक्यात एकूण नऊ ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून, प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी केले आहे.
प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभरात हे अभियान राबवले जात आहे. अनेकदा कागदपत्रांच्या त्रुटींमुळे किंवा माहितीअभावी सामान्य नागरिकांचे महसूलविषयक प्रश्न प्रलंबित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी एकाच छताखाली १५ प्रकारच्या विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
१५ सेवांचा एकाच ठिकाणी ‘निकाल’
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८-अ उतारा वाटप, उत्पन्न, जात, रहिवासी आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे यांसारख्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या दाखल्यांचा समावेश आहे. तसेच सनद प्रक्रियेची माहिती, अकृषिक (NA) तरतुदींचे मार्गदर्शन, तुकडेबंदी प्रकरणे, पानंद रस्ते मान्यता, घरपट्टे वाटप, मोजणी अर्ज आणि पीएम किसान नोंदणी अशा महत्त्वपूर्ण कामांचा निपटारा या शिबिरात केला जाईल.
असे आहे शिबिरांचे वेळापत्रक:

तारीखठिकाण (शिबिर स्थळ)
७ मार्चमहावीर धाम जैन मंदिर, शिरसाट (शुभारंभ)
९ मार्चसेंट जोसेफ कॉलेज, नंदाखाल (कोपराड)
१४ मार्चअण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार (पूर्व)
१६ मार्चविश्वकर्मा हॉल, नवघर (वसई रोड पश्चिम)
१० एप्रिलतलाठी मंडळ अधिकारी कार्यालय, निर्मळ
१३ एप्रिलजैन मंदिर, पोमन
१७ एप्रिलएम. जी. परुळेकर हायस्कूल, वसई गाव
८ मेमदर मेरी हायस्कूल, आचोळे
१५ मेग्राम महसूल कार्यालय, उमराळे

“ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे आणि महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रांवर उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा.”

  • दीपक गायकवाड, तहसीलदार, वसई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *