विरार (प्रतिनिधी):
गाव मौजे माणिकपूर सर्व्हे नंबर 89/अ/4 या जागेवरील अनधिकृत बांधकामावर सात दिवसांत कारवाई करावी; अन्यथा पालिका कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी दिला आहे.

डिसिल्वा यांनी 2 जुलै 2025 रोजी महापालिकेकडे अर्ज करून हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी स्मरणपत्र देण्यात आले असून संबंधित बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र प्रत्यक्षात कारवाई न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या अनधिकृत बांधकामासंदर्भात वसई-विरार महानगरपालिका प्रभाग समिती (एच) च्या कनिष्ठ अभियंत्याने 17 जून 2025 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53 व 57 अंतर्गत नोटीस बजावली होती. नोटीसीनंतर नऊ दिवसांच्या आत कारवाई अपेक्षित होती, मात्र एक महिना उलटूनही महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, अशी तक्रार डिसिल्वा यांनी केली.

त्यांनी पुढे सांगितले की, “विरार पूर्व विजय नगर येथे रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेत 17 नागरिकांचा मृत्यू झाला. तरीदेखील पालिकेची ही निष्काळजी वृत्ती अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणारी आहे. हे केवळ बेजबाबदारपणाचे नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेशी खेळण्याचे कृत्य आहे.”

प्रभाग समिती एचचे सहाय्यक आयुक्त व कनिष्ठ अभियंता यांची ही वर्तणूक महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या कलम 3 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत, त्यांच्या विरुद्धही कारवाई करण्याची मागणी डिसिल्वा यांनी केली आहे.

शेवटी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सात दिवसांत कारवाई न झाल्यास मी पालिका कार्यालयात आंदोलन करणार आहे. आंदोलनावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास महापालिका जबाबदार राहील.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *