

प्रतिनिधी, वसई मर्सेस.
रानशेत-वाडी परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. दयामाता चर्चजवळ झाड तोडण्याचे काम सुरू असताना लाईन बंद न केल्याने सुरज कुमार (वय २२) या तरुणाचा विजेचा शॉक लागून घटनास्थळीच मृत्यू झाला. या धक्कादायक हलगर्जीपणामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.
लाईन सुरू, काम सुरू – निष्पाप जीवाची आहुती
सुरज झाड कापण्यासाठी वर चढला असता, वीजपुरवठा बंद न केल्याने त्याला जबरदस्त विजेचा झटका बसला. काही सेकंदातच तो खाली कोसळला आणि त्याच जागी प्राण गमावले. ही दुर्घटना दयामाता चर्चच्या बाजूला सकाळच्या सुमारास घडली.
ग्रामस्थ आक्रमक – दोषींवर कारवाईची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वीज वितरण विभागाच्या बेपर्वा वागणुकीवर संताप व्यक्त करत, “लाईन बंद केल्याशिवाय काम सुरू करणं म्हणजे सरळसरळ जीवाशी खेळ,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर – प्रशासन शांत
२२ वर्षांचा सुरज, मेहनती आणि स्वप्न बाळगणारा तरुण, दुर्दैवाने मृत्यूमुखी पडल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मात्र, प्रशासन अजूनही शांत – दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
“दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे” – ग्रामस्थांची एकमुखी मागणी
गावकऱ्यांनी या दुर्घटनेतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी स्वरूपात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा मोर्चा आणि रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला आहे.