
वृत्तसेवा, विरार: समाजात निस्स्वार्थपणे आणि सतत कार्यरत राहून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या ‘माणुसकी फाउंडेशन’च्या कार्याचा विरारमध्ये गौरव करण्यात आला. विरार येथील ‘राम-जानकी हेल्थकेअर सेंटर’ येथे ‘अविण्य फाउंडेशन’च्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात माणुसकी फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा रजनीताई गडा आणि कार्याध्यक्ष ॲड. किरण म्हात्रे यांच्यासह १५ कर्तृत्ववान महिलांना ‘नारी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिला सक्षमीकरण, गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच विविध सामाजिक जनजागृती उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अविण्य फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर यांनी सर्व सन्मानित महिलांचे अभिनंदन केले. “माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून रजनीताई आणि किरणताई ज्या तळमळीने समाजसेवा करत आहेत, ती खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
या सोहळ्यात प्रीती जाधव, योजना गुरव, रुचिता नाईक, अमिता शिंदे, स्मिता कंडार, कीर्ती पंडित, प्रीती पालकर, कीर्ती शेंडे, ॲड. किरण म्हात्रे, किशोरी पाटील, वृंदा दिवेकर, रजनी गडा, प्रगती आचरेकर, प्रांजल नारकर आणि सौ. कोकरे या १५ जणींचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला राम-जानकी हेल्थकेअर सेंटरचे डॉक्टर, अविण्य फाउंडेशनचे डॉ. सुशील सावंत, समृद्धी संस्थेचे संस्थापक सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नागरे, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर, सचिव राजेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजय बाळकृष्ण धामणे यांनी मानले.
