परवानगी कागदपत्रे सादर करण्यासाठी पालिकेची नोटीस

सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोझा यांच्या नोटिसीला व्यावसायिकाकडून केराची टोपली

प्रतिनिधी

विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सीअंतर्गत ‘मर्चंट फायर वर्क्स या फटाका विक्री दुकानाला सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीची कागदत्रे सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोझा यांनी नोटीस बजावली आहे. 27 जानेवारी 2025 रोजी बजावलेल्या या नोटिसीत पालिकेने संबंधित व्यावसायिकाला तीन आठवड्यांत आवश्यक कागदत्रे सादर करण्याचा आदेश दिला आहे. भाजप विरार शहर मंडळ सरचिटणीस महेश कदम यांच्या तक्रारीनंतर पालिकेने ही कार्यवाही केली होती. मात्र या नोटिसीला संबंधित व्यावसायिकाने केराची टोपली दाखवलेली आहे.

वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सीअंतर्गत ‘मर्चंट फायर वर्क्स या दुकानात फटाके विक्रीसोबत फटाके बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात आला असल्याची तक्रार महेश कदम यांनी 27 जानेवारी 2025 रोजी वसई-विरार महापालिका प्रभास समिती ‘सीमध्ये केली होती. फटाके विक्री व त्यांच्या निर्मितीकरता सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. तसेच फटाका कारखाना किंवा दुकान कुठे असावे? याबाबतही कडक नियमावली आहे, मात्र या नियमांची ‘मर्चंट फायर वर्क्स कडून अंमलबजावणी झालेली नसल्याचे महेश कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

अनधिकृत फटाके स्टॉलधारकांना परवानगी नसल्याने सार्वजनिक ठिकाणी पुरेशा सुरक्षेअभावी आग लागण्याची दुर्घटना घडू शकते. या दुर्घटनेत जीवितहानी व वित्तहानी होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी कदम यांची मागणी आहे.

दरम्यान; वसई-विरार शहर महानगरपालिका दिवाळीअगोदर पालिका हद्दीत फटाके स्टॉलधारकांना तात्पपुरती परवानगी देत असते. मात्र तात्पुरत्या स्टॉलधारकांची संख्या मर्यादित असतानादेखील वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात स्टॉलधारकांची संख्या दिवाळीदरम्यान दिसून येत असते. बहुतांश वेळा सर्व नियम धाब्यावर बसवून ठिकठिकाणी स्टॉल उभारले जात असतात. अशा स्टॉलधारकांवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत असते.

मात्र आता कायमस्वरूपी स्टॉलधारकांकडे परवानगी नसल्याच्या तक्रारी असल्याने शहरवसीयांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आलेला आहे. पालिकेच्या हद्दीत अलीकडच्या काळात आग लागण्याच्या दुर्घटनांत प्रचंड हानी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या धर्तीवर अनधिकृत फटाके स्टॉलधारकांवर पालिका, पोलीस व अग्निशमन विभागाने कारवाई करावी, अशी भाजप विरार शहर मंडळ सरचिटणीस महेश कदम यांची मागणी आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *