
कपिल पाटील यांचा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल


गुजराथच्या ‘दोन व्यापाऱ्यांची अवलाद’ अशा शब्दात खुद्द शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुजराथ, गुजराथी आणि मुंबईकर व्यापारी यांच्यावर केलेला हल्लाबोल धक्कादायक आहे. सांविधानिक मूल्यांशी प्रतारणा करणारा आहे. जातीय आणि भाषिक द्वेषाने भरलेलं वक्तव्य ज्यांना ‘कुटुंबप्रमुख’ मानलं त्यांनी करावं हे जितकं धक्कादायक, तितकंच वेदनादायक आणि चिंताजनक आहे.
राजकीय विरोधाची भाषा कठोर असू शकते. पण व्यक्ती विरोध जेव्हा व्यक्ती द्वेषात आणि व्यक्तीद्वेषाची परिणीती जातीद्वेषात होते तेव्हा ती चिंतेची बाब ठरते. मुंबई आणि महाराष्ट्राशी एकरूप झालेल्या गुजराथी समाजावर आणि खेड्यापाड्यात पसरलेल्या लहान सहान व्यापारी समाजाला उद्धव ठाकरे कसं काय लूटखोर ठरवू शकतात. ते या राज्याचे कुटुंबप्रमुख होते. त्यांच्या या कुटुंबात इथे स्थायिक झालेला आणि एकरूप झालेला गुजराथी सामील नाही का ? संबंध समाजाला ते कसं काय दोषी ठरवू शकतात ?
गुजराथी – मारवाडी व्यापारी समाजाचे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक शाळा-कॉलेजं, संस्था, इस्पितळं सुरू केली. त्यात असंख्य मराठी माणसं आणि त्यांची मुलं हक्काने जातात. तिथे कोणताही भेदभाव नाही.
खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी भीमजी पारेख या मुंबईतील व्यापाऱ्याकडून छापखाना विकत घेतला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुजराथी समाजाला पेढ्या काढून दिल्या होत्या. तो गुजराथी समाज घरातही मराठी बोलतो. अगदी रायगडच्या जवळ असलेल्या महाडचे गुजराथी असोत किंवा ग्रामीण महाराष्ट्रातील. इतका तो इथल्या मातीशी एकरूप झाला आहे.
अनेक गुजराथी भाषी पारशी, वैष्णव आणि मुस्लिम यांनी मुंबईत उद्योगधंदे उभे केले. नावारूपाला आणले. थोर समाजसुधारक करसनदास मूलजी, स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता, सहकारी चळवळीला मदत करणारे वैकुंठभाई मेहता, समाजवादी नेते अशोक मेहता, विठ्ठलभाई पटेल, संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे नवनीतभाई शहा, आजही शंभरीत कार्यरत असलेले डॉ. जी. जी. पारिख, विकासाला हातभार लावणारे धीरूभाई अंबानी किंवा आताचे मुकेश अंबानी किंवा अंबरीश पटेल असोत. असे अनेक आहेत. त्यांचं योगदान आहे.
नंदुरबारला इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलणारे शिरीषकुमार मेहता, धनसुखलाल वणी, घनश्याम दास हे बालस्वातंत्र्यसैनिकही गुजराथीभाषिकच होते.
‘कार्यकर्त्यांची खाण म्हणजे महाराष्ट्र’ अशा शब्दात महाराष्ट्रावर प्रेम करणारे आणि कर्मभूमी मानणारे महात्मा गांधीजी मूळ गुजराथचेच होते. त्यांचे प्राण दोनदा प्रबोधनकार ठाकरे यांनी वाचवले.
यासर्वांना उद्धवजी महाराष्ट्राच्या कुटुंबाचे सदस्य मानत नाहीत काय ?
यापूर्वीही गुजराथी विरुद्ध मराठी असा उल्लेख होत होता. परंतु स्वत: उद्धवजी ठाकरे यांनी द्वेषाने भरलेलं वक्तव्य करणं चिंताजनक आहे.
संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मित्रपक्षांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेना (उबाठा) यांना समर्थन दिलं. जन्मस्थानावरुन कोणताही भेद करू नये असं आपलं संविधान सांगतं. (कलम 15)
उद्धवजी यांचं हे वक्तव्य संविधानाशी प्रतारणा करणारं आहे. समाजात विद्वेष निर्माण करणारं आहे. यात ना महाराष्ट्राचं भलं आहे, ना मराठी भाषिकांचं भलं आहे. समाजासमाजात असं वैमनस्य निर्माण करणं महाविकास आघाडीला मान्य आहे काय ? दोन्ही घटकपक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी याबद्दलची भूमिका तात्काळ स्पष्ट केली पाहिजे.
हे वक्तव्य चुकून झालं असल्यास मा. उद्धवजी ठाकरे यांनी खुलासा केला पाहिजे.
राजकीय वादांमध्ये सभ्यतेच्या मर्यादा सोडून जो भाषा प्रयोग आणि शब्द प्रयोग होत आहेत. ते मराठी शब्दकोशातही सापडत नाहीत. सर्वच जबाबदार राजकीय नेत्यांनी अशा शब्दांची चिखलफेक करू नये, ही अपेक्षा बाळगणं आता व्यर्थ ठरतं आहे.याचं दुःख आहे.