
पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे २१ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रचना, व मेघा, आणि इप्सा या दोन मुली असा परिवार आहे.
नाशिक येथे गावकरी दैनिकापासून पत्रकारितेची सुरुवात करणारे राम परमार हे ९० च्या दशकात पालघर येथे वडिलांच्या व्यवसाया निमित्ताने आले आणि मग त्यांनी इंग्रजी वृयपत्रात लिखाण सुरू केले, सध्या हिंदुस्थान टाइम्स व फ्री प्रेस या इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काम करत होते. तत्पूर्वी त्यांनी अनेक वर्षे मिड-डे व मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकात काम केले होते. राम याचे शिक्षण बीएस्सी केमिस्ट्री पर्यन्त झाले होते,
पालघर जिल्ह्यातील इंग्रजीतील मोजक्याच पत्रकारांमध्ये राम परमार यांचे एक वेगळे स्थान होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तसेच स्थानीय विषय समजून घेऊन त्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली होती अनेक शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील व्यक्तीचे सौहार्दाचे संबंध त्यानी निर्माण केले होते .
सर्वांशी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध असलेले राम हे हसतमुख व्यक्तिमत्व होते. रोटरी क्लब पालघर मध्ये त्यांनी काही काळ बुलेटीन एडिटर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.
जिल्ह्याने संवेदनशील पत्रकार गमावला
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या संवेदनशील मार्गाने सोडविणारे अष्टपैलू पत्रकार राम परमार यांचे निधन झाले असून जिल्ह्याने एक संवेदनशील पत्रकार गमावला आहे अशी दुःखद भावना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली.