
प्रतिनिधी : वसई तहसीलदार कार्यालयाकडून अधिकार नसताना तुकडे करून बिनशेती आदेश मंजूर केले जात होते. तहसीलदारांच्या मनमानीला आळा घालून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला असून बिनशेती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मंजूर केले जाणार आहेत. तहसीलदारांना हा जबरदस्त धक्का आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, ४० गुंठे वरील बिनशेती आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर करण्याचा नियम असताना वसई तहसील कार्यालयाकडून नियमबाह्य पद्धतीने तुकडे करून ४० गुंठे पेक्षा अधिक भूखंडांचे बिनशेती आदेश मंजूर केले जात होते. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाला तक्रारी देण्यात आलेल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई करून एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार बिनशेती आदेश यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारीत केले जातील असे आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेली ही सणसणीत चपराक असून तहसीलदारांचे अधिकार काढून घेणे ठीक आहे परंतु तुकडे करून नियमबाह्य व मनमानी पद्धतीने कामकाज हाताळणाऱ्या तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.