
भाजप कार्यकर्त्याची कायमची हरकत

प्रतिनिधी
विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘आय`अंतर्गत येणाऱ्या तामतलाव येथील मार्केट इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आक्षेप वसई भाजप जिल्हा सचिव अल्पसंख्याक मोर्चाचे तसनीफ शेख यांनी नोंदवला आहे. या बांधकामात कामचलाऊ साहित्य वापरल्याचा आरोप करत त्यांनी या कामावर कायमची हरकत घेतली आहे.
या संदर्भात त्यांनी 27 जानेवारी रोजी वसई-विरार महापालिका आयुक्त, प्रभाग समिती ‘आय` सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच वसईच्या विद्यमान आमदार स्नेहा पंडित-दुबे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. मार्केट इमारतीच्या कामात कामचलाऊ साहित्याचा वापर झाल्याने या बांधकामाचा दर्जा खालावला आहे. भविष्यात या इमारत परिसरातून हजारोंच्या संख्येने सकाळ-संध्याकाळ नागरिक ये-जा करणार असल्याने दुर्दैवाने काही घटना घडल्यास त्यांच्या जीविताला धोका उद्भवणार आहे. त्यामुळे महानगरपालिका अधिनियमानुसार संबंधित ठेकेदाराविरोधात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तसनीफ शेख यांनी या पत्रातून केली आहे.