
प्रश्न आहे साधा, महानगरपालिकेला शिस्तीची बाधा…
वसई प्रतिनिधी : एखाद्याला फक्त आश्वासनावर कसं जिवंत ठेवावे ही कला फक्त राजकारण्यांना नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थीत जमते. अनधिकृत बांधकामांना पाठीमागून संरक्षण देणे हा काही महानगरपालिकेसाठी नवा विषय नाही. जोपर्यंत गळ्यापर्यंत विषय येत नाही तोपर्यंत सर्वकाही अधिकृत.
परंतु पत्रकारांनी मुद्दा उचलून धरला की सगळी यंत्रणा जागी होते. मग पटापट जोपर्यंत बिल्डरला कोर्टातून स्टे ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत पत्रकाराला या न् त्या कारणात गुंतवून ठेऊन एकदा का बिल्डरला कोर्टातून स्टे ऑर्डर मिळाली की मग घोडं गंगेत न्हाले.
असाच काहीसा प्रकार घडला आहे गाव मौजे मोरे, सव्र्व्हे नंबर १९३, हिस्सा नंबर ४ (अ) या भुखंडावर. विकासक संजय कालेकर यांनी बांधलेल्या या भुखंडावरील इमारती या अनधिकृत असून या अनधिकृत बांधकामां विरोधात सामाजिक कार्यकर्ता हरिशंकर जयस्वाल यांनी विरोध दर्शविला आहे. हरिशंकर जयस्वाल यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर ७ दिवस उपोषण करून
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास प्रवृत्त केले परंतु संजय कालेकर यांना मूक पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना काहीच फरक पडलेला नाही.
अधिकारी संजय कालेकर यांना मॅनेज होऊन न्यायालयात केबीट दाखल करण्याचे विसरून गेले. ही केबीट न दाखल केल्याने संजय कालेकर यांनी न्यायालया कडून तत्काळ स्टे ऑर्डर आणली आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
७ दिवस उपोषण करणाऱ्या हरिशंकर जयस्वाल यांना कारवाईचे गाजर दाखवून अधिकाऱ्यांनी संजय कालेकर यांना किल्ला सर करून दिला. न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत प्रकरण “जैसे थे” ठेवण्याचा आदेश दिला, परंतु महानगरपालिकेचा आशिर्वाद प्राप्त झाला असल्याने कालेकर यांनी आदेश फाट्यावर मारून इमारतीचे बांधकाम पुर्ण केले.
काहीच कारवाई होत नाही हे बघून उपोषणकर्ता हरिशंकर जयस्वाल यांनी मंत्रालयाची वाट धरली. गृह विभागाच्या सचिवांनी प्रकरणात जातीने लक्ष घालून तत्काळ पोलिसांना संजय कालेकर यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मिळाल्याने हरिशंकर जयस्वाल यांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. परंतु पोलिसांनी आदेशात त्रुटी असल्याचे कारण पुढे करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. आता या गोष्टीला ४ महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अजून फाईल पुढे सरकलेली नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व पोलीसांनी संजय कालेकर यांना आपला जावई बनून घेतल्याने यांना गुन्हा दाखल करण्यात मुहूर्त मिळालेला नाही. परंतु काहीही झाले तरी शेवटपर्यंत प्रकरणाचा पाठ सोडणार नाही असे सामाजिक कार्यकर्ता हरिशंकर जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.