…अखेर तहसीलदार अविनाश कोष्टींनी भूमाफिया विलास म्हात्रेला लावला 30 कोटींचा दंड !

, वसई– प्रतिनिधी
मौजे भुईगाव, सर्वे क्र. 163 या शासकीय जमिनीत सुमारे 6 ते 7 हेक्टर कांदळवनांची कत्तल करून या जागेवर 29 हजार ब्रास मातीभराव करून कोळंबी प्रकल्पासाठी अनधिकृतरित्या 15 तलाव तयार केल्याप्रकरणी वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी स्थानिक भूमाफिया विलास म्हात्रे याला सुमारे 30 कोटी रुपयांचा दंड लावण्याचे आदेश दिले आहेत. एवढ्या मोठ्या रकमेचा दंड लागण्याची ही वसईतील पहिलीच घटना असल्यामुळे सध्या हा सर्वांच्या चर्चेचा विषय झालेला आहे. तहसीलदारांनी दंड लावल्यानंतरही भूमाफिया विलास म्हात्रे आजही या ठिकाणी आपला कोळंबी प्रकल्प राजरोसपणे चालवत असून यातून तो महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. त्यामुळे केवळ कागदावर दंड लावून आपले समाधान होणार नसून भूमाफिया विलास म्हात्रेकडून तीस कोटी रुपयांची वसुली होईपर्यंत तसेच सदर भूखंडाचा ताबा शासनाकडे जाईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे कांदळवनांच्या कत्तलीप्रकरणी विलास म्हात्रेवर गुन्हे दाखल करण्यासही त्या प्रयत्नशील आहेत.

कायदे तज्ज्ञांचे मोलाचे सहकार्य
या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना वनिता पाटील यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून सतत सरकार दरबारी मी या प्रकरणाचा पाठपुरावा करीत होते. मी अज्ञानी व आर्थिक परिस्थितीने कमजोर असल्यामुळे सरकारी कार्यालयातील बाबूंनी अनेकदा मला वेड्यातही काढले. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून भूमाफिया विलास म्हात्रेने मला त्रास देण्याचाही प्रयत्न केला. पण या त्रासानेच मला सक्षम बनवले. या दरम्यान अनेकांनी मला मदद करण्याचे आश्वासन दिले. मात्र वसईतील एक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वगळता इतर कोणीही माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिले नाही. पोलिसांनी तर मलाच वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र या कायदेतज्ज्ञांनी कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता उदार भावनेने मला मदतीचा हात वेळोवेळी दिला. आज त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी भूमाफिया विलास म्हात्रेला आर्थिक दंड लावू शकले हे सत्य आहे. आज सरकारी कार्यालयात सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला असल्यामुळेच या लढाईला यश येण्यासाठी तीन वर्षे लागली.

कांदळवन कत्तलीच्या गुन्ह्यासाठी प्रयत्नशील
केवळ दंड लावण्याच्या कारवाईने माझी लढाई संपलेली नसून जोपर्यंत कांदळवन कत्तलीप्रकरणी विलास म्हात्रेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे. कांदळवनांची कत्तल करणारे विलास म्हात्रेसारखे अनेक भूमाफिया सध्या वसई तालुक्यात सक्रिय असल्यामुळे वसई तालुक्याची निसर्गसंपन्नता आज धोक्यात आलेली आहे. या विरोधात कोणीतरी आवाज उठवणे गरजेचे आहे तसेच कांदळवनांच्या कत्तलीवरही अंकुश आणणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *