शासनाने निश्चित करून दिलेले रिक्षाभाडेदराचे फलक ८ मार्च २०२५ या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वसई-विरार शहरात लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मनमानी भाडे वसूल करून सर्वसामान्य प्रवाश्यांची होत असलेली पिळवणूक आता थांबणार असल्याने शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा ठाणे संपर्कप्रमुख हितेश जाधव व पदाधिकारी यांच्यासोबत पालघर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत. वसई-विरार शहरातील नागरिकांचा रिक्षा प्रवास सुकर व्हावा आणि त्यांची सुरु असलेली आर्थिक लूट थांबावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रदीर्घ लढा दिला. यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनदेखील केले. अखेरीस राज्य शासनाने रिक्षाभाड्याचे निश्चित करून दिलेले दर सर्व रिक्षा चालक-मालक संघटनांना बंधनकारक करण्यात यावेत आणि त्याचे फलक शहरातील सर्व अधिकृत रिक्षा स्टॅन्डवर तसेच महत्वाच्या रहदारीच्या ठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागील काही वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती. यासंदर्भात स्थानिक प्रशासनापासून मंत्रालयीन पातळीपर्यंत याचा पाठपुरावा सुरु होता. जिल्हाधिकारी स्तरावर अनेक वेळा बैठकाही झाल्या.

अखेरीस जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात आता ठोस कारवाई करण्याचे निर्देश वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची होत असलेली कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यकतेनुसार ट्राफिक गार्ड आणि त्याच्यासोबत एक वाहतुक शाखेचा कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या बैठकीस पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रहारचे पालघर जिल्हाध्यक्ष-ठाणे संपर्कप्रमुख हितेश जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, विरार वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *