वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी मोहीम राबवित ऐतिहासिक कारवाई करत नालासोपारा पूर्व येथील साडी कंपाऊंड परिसरातील एका गोडावूनमधून ९ टनांपेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. ही महानगरपालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी प्लास्टिक जप्तीची कारवाई ठरली आहे.

महानगरपालिकेचे मा.आयुक्त श्री. मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘डी’ – आचोळेचे सहाय्यक आयुक्त श्री. जितेंद्र नाईक व त्यांच्या पथकाने आज (५ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ही धडक कारवाई केली.

प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने तात्काळ गोडावूनवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान मा.आयुक्त सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईची पाहणी केली व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

संबंधितांवर नियमांनुसार ₹५०००/- दंड वसूल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.

नियमभंगासाठी शिक्षा

महानगरपालिका प्रशासनाने यावेळी नागरिक व व्यापाऱ्यांना नियमांची आठवण करून दिली :

पहिला गुन्हा : ₹५,००० दंड

दुसरा गुन्हा : ₹१०,००० दंड

तिसरा गुन्हा : ₹२५,००० दंड + ३ महिन्यांपर्यंत कारावास

आयुक्तांचे आवाहन

“पर्यावरणसंवर्धनासाठी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर थांबवणे अतिशय गरजेचे आहे. व्यापारी व नागरिकांनी नियमांचे पालन करून शहरास स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन मा.आयुक्त श्री. सूर्यवंशी यांनी केले.

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधातील कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *