Oplus_131072

  • वसई-विरार परिसरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कडक कारवाईची अपेक्षा
  • अवघ्या पाच ते दहा हजारांच्या आमिषापोटी बँक खात्यांचा गैरवापर सुरू

वसई : (प्रतिनिधी) वसई-विरार परिसरात ड्रग्सविरोधी मोहिमेनंतर आता वाढत्या सायबर फसवणुकीने चिंताजनक रूप धारण केले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणुकीत ‘म्युल अकाउंट्स’ (Mule Accounts) चा वापर करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी ‘परिवर्तन लढा’चे अध्यक्ष सुशांत पवार यांनी मीरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेत कौशिक यांच्याकडे केली आहे.​वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील काही तरुणांना अवघ्या पाच ते दहा हजार रुपयांच्या प्रलोभनाने त्यांची बँक खाती वापरण्यासाठी दिली जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अनेक प्रकरणांमध्ये खातेदारांना त्यांच्या खात्याचा असा गैरवापर होत असल्याबाबत कोणतीही कल्पनाच नसते. चोरांनी लुटलेली रक्कम एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर न काढता, वेगवेगळ्या खात्यांमधून छोट्या-छोट्या रकमेत ती फिरवली जात असल्याचा दावा सुशांत पवार यांनी केला आहे. सायबर गुन्हेगार देशभरातील नागरिकांची फसवणूक केल्यानंतर ही रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता इतरांच्या बँक खात्यांमध्ये वळवतात. अशा प्रकारच्या खात्यांना ‘म्युल अकाउंट्स’ म्हटले जाते.​अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मूळ सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याऐवजी केवळ स्थानिक खातेदारावरच कारवाई होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पोलिसांनी खात्यांमधील व्यवहारांची साखळी, मोबाईल क्रमांक, डिजिटल व्यवहार आणि संबंधित मध्यस्थांचा सखोल तपास करून थेट मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या कामासाठी अनेक तरुण पोलिसांना साहाय्य करण्यास तयार असून, त्यांच्या मदतीने या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचता येऊ शकते, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.​रिझर्व्ह बँकेनेही (आरबीआय) अशा प्रकारच्या खात्यांचा वापर फसवणुकीतून मिळालेली रक्कम पुढे वळवण्यासाठी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ‘१४ सी’ (14C) आणि आरबीआयच्या माध्यमातून संशयित खात्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, यावर आळा घालण्यासाठी यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *