
मिरा रोड: प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित सार्वजनिक व घरगुती गणपती उत्सव सजावट स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ आणि कॅप्टन कै. कौस्तुभ राणे स्मरणार्थ कार्यक्रम शनिवारी (दि. २९ ऑगस्ट २०२६) मिरा रोड येथील लता मंगेशकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, संपूर्ण नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.
प्रशासकीय गैरसोयीबद्दल नाराजी कार्यक्रमादरम्यान नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा (AC) बंद असल्याचे समोर आल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र खेद व्यक्त करत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थेवर जाहीर नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहातील सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करत, प्रत्येक नागरिकाने १०० रुपयांचे योगदान डिमांड ड्राफ्टद्वारे (DD) पाठवावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
विजेत्यांना भरघोस रोख पारितोषिके या सोहळ्यात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
- सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धा:
- प्रथम क्रमांक: १ लाख रुपये व मानचिन्ह
- द्वितीय क्रमांक: ५१ हजार रुपये व मानचिन्ह
- तृतीय क्रमांक: २५ हजार रुपये व मानचिन्ह
- घरगुती गणपती सजावट स्पर्धा:
- सहभागी ३०० हून अधिक स्पर्धकांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती गणेशभक्त, नागरिक व विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शिवसेना पदाधिकारी राजू भोईर, सचिन मांजरेकर, निशा नार्वेकर, डॉ. प्रीती पाटील, तावडे, दीप काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या उत्साही वातावरणात पार पडलेल्या सोहळ्यामुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला आणखी बळ मिळाले आहे.
