महानगरपालिकेतील प्रकार; आयुक्तांच्या आदेशानंतरही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांकडे फाईल दडपून ठेवल्याचा आरोप

(विशेष प्रतिनिधी) वसई-विरार: महानगरपालिकेच्या सेवेतील पात्र आणि हक्कदार स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून कंत्राटी (ठेक्यावरील) दोन आरोग्य निरीक्षकांना डावलून पदे लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात त्रस्त कर्मचाऱ्यांनी थेट मनपा आयुक्तांची भेट घेऊन भक्कम पुराव्यांसह सविस्तर तक्रार दाखल केली आहे. आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊनही, मागील चार ते पाच दिवसांपासून ही महत्त्वाची टिप्पणी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्याशी टेबलवर जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्थायी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर डल्ला मारत ठेक्यावरील कर्मचाऱ्यांची वर्णी लावल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने संबंधित प्रकरणाची दखल घेत चौकशीचे निर्देश दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार आस्थापना विभागाने नियमांनुसार टिप्पणी तयार करून ती स्वाक्षरीसाठी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे पाठवली. मात्र, चार ते पाच दिवस उलटूनही त्यावर कोणतीही स्वाक्षरी झालेली नाही.”आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? पुराव्यांसह तक्रार दिल्यानंतरही दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का?” असा संतप्त सवाल स्थायी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आयुक्तांच्या आदेशालाच प्रशासकीय पातळीवर केराची टोपली दाखवली जात असल्याने, यामागील बड्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि सेवा नियमांनुसार आयुक्तांच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असताना, फाईल विनाकारण रोखून धरून ठेवणे हा कर्तव्यात कसूर (Dereliction of Duty) ठरू शकतो. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून तात्काळ फाईल मागवून घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करत स्थायी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी आक्रमक मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाची आंदोलनात्मक व कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *