वसई-विरार (प्रतिनिधी): नालासोपाऱ्यातील नागरिकांना आणि पोलीस स्थानकात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्येवर आवाज उठवत, ‘सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संजीव पांडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नालासोपाऱ्यातील पोलीस स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे कायदेशीर निवेदन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर केले आहे.

नेमकी समस्या काय?

नालासोपाऱ्यात (प.) असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही अधिकृत सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. विविध कामांसाठी आणि तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात दूरवरून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, तसेच ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही पिण्याच्या पाण्याच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर खंत या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासकीय पातळीवर निवेदनोंदणी

जनहित लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संजीव पांडे यांनी या गंभीर विषयावर तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मीरा भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशिक, तसेच म्हाडा बोळींज विरारचे पोलीस उपायुक्त आणि नालासोपाऱ्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे अधिकृतरीत्या अर्ज सादर केला आहे.

नागरिकांमधून स्वागत

सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः पोलीस स्थानकांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. या विषयाला वाचा फोडल्याबद्दल सुजाण नागरिकांमधून आणि सामाजिक वर्तुळातून सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार संजीव पांडे यांच्या या कायदेशीर व जनहितकारक भूमिकेचे स्वागत होत असून, प्रशासन यावर किती लवकरात लवकर कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *