
विरार पोलिसांची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त
नालासोपारा :- डान्सबार मालकाने अनोखी शक्कल लढवून पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क विरारच्या एका रिसॉर्टमध्ये डान्स बार सुरू केल्याचे कारवाई झाल्यावर उघडकीस आले आहे. विरार पोलिसांनी गुरुवारी रात्री सदर रिसॉर्टवर छापा मारून लाखोंचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलींसह, ग्राहक आणि हॉटेलच्या कर्मचार्यांना अटक केली आहे. रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू करण्याची ही पहिलीच घटना आहे.
कोरोनाच्या लाटेमुळे राज्य सरकारने घातलेल्या निर्भन्धांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाण्यातील ऑर्केस्ट्रा बार बंद झाले आहेत. त्यामुळे काशीमिरा येथील एका डान्सबार मालकाने अनोखी शक्कल लढवत रिसॉर्टमध्येच डान्स बार सुरू करण्याचे ठरवले. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चांदीप गावाजवळ असलेल्या मॉस या रिसॉर्टमध्ये अंधेरी व इतर ठिकाणाहून काही महिलांना, तरुणींना बोलावून ऑर्केस्ट्रा डान्स बार सुरू करण्यात आला होता. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हा रिसॉर्टमधला डान्स बार छुप्या पध्दतीने सुरू होता. याची कुणकूण विरार पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी गुरूवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास सापळा लावून कारवाई केली. या कारवाईत बारबाला, ग्राहक आणि हॉटेलचा व्यवस्थापक आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. काशिमिरा येथील बॉसी नावाच्या डान्सबार मालक सचिन दांडगे याने हा बार सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली असून तो फरार असल्याचे सांगितले. पोलिसांनी वेटर कृष्णा शेट्टी (37), रिसॉर्ट मॅनेजर नवीन शेट्टी (34), वेटर विनोद साव (24), कामगार सुधीरकुमार यादव (21), गायक नावेदहसन खान (36) यांच्यासह बारबाला, ग्राहक यांच्यावर गुन्हा दाखल करून शुक्रवारी दुपारी अटक केलेल्या आरोपींना वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमांसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी रोख रक्कम, दारूच्या बाटल्या, 2 नोटा मोजण्याच्या मशीन, डेबिट क्रेडिट कार्ड स्वॅप करण्याचे 3 मशीन, मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण 5 लाख 27 हजार 343 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रिसॉर्ट मालकावरही गुन्हे दाखल केले असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.