
कळंभई, ता. वाडा : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सतर्फे आश्रमशाळा, कळंभई, पोस्ट पालसई, तालुका वाडा येथे ३५०० लिटर क्षमतेचा सौर जलतापक प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शाळेतील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळण्यास सुरुवात झाली.
या प्रकल्पासाठी एकूण ₹४,८९,००० खर्च आला. मुंबईतील एका दानशूर व्यक्तीने आपल्या दिवंगत पत्नी स्व. मीना पी. चोप्रा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सला भरीव आर्थिक योगदान दिले. तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई महावीर नगर आणि स्पोर्टिंगलायन्स फाउंडेशन यांचेही या प्रकल्पासाठी विशेष आर्थिक सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रकल्पाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन नटवर बंका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विक्रमगडचे आमदार श्री. हरिचंद्र भोये, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विकास सराफ आणि सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनील लावटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय पीडीजी लायन डॉ. प्रशांत पाटील, पीडीजी लायन शशिकांत मोध, जीएसटी चेअरपर्सन सुमित अग्रवाल, डीसी – परमनंट प्रोजेक्ट जयसिंग नेगांधी आणि झोनल चेअरपर्सन सी. ए. निलेश घरत हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सच्या अध्यक्षा ला. डॉ. अनुप्रिता पेडणेकर यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचे तसेच सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले. शाळेच्या गरजेनुसार भविष्यातही आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्लब प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
पीडीजी ला. डॉ. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध लायन्स क्लबच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा आणि मदतीचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी, असे आवाहन केले.
आमदार श्री. हरिचंद्र भोये यांनी शाळेच्या स्थापनेपासूनच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेच्या पुढील विकासासाठी उपस्थितांनी यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. नटवर बंका यांनी लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्टच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी विद्यार्थ्यांसाठी सौर जलतापकाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स, लायन्स क्लब ऑफ मुंबई महावीर नगर, स्पोर्टिंगलायन्स फाउंडेशन आणि देणगीदारांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होत असून, लायन्स क्लबने यापुढेही शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लायन्स क्लब ऑफ मुंबई महावीर नगरच्या अध्यक्षा ला. आरती शहा, फर्स्ट व्हाइस प्रेसिडेंट भारती नेगांधी, खजिनदार लायन हिरेन पारेख तसेच क्लबचे इतर सन्माननीय सदस्य सदर प्रसंगी उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सच्या अध्यक्षा ला. डॉ. अनुप्रिता पेडणेकर, उपाध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर, सचिव विपुल चौधरी, खजिनदार अजित चौधरी यांच्यासह इव्हेट कुटीन्हो, राजेश मोदगेकर, उमेश मेस्त्री, अंजली मेस्त्री, यशवंत जाधव, ईश्वरन एन. व्ही., किसन लोखंडे, वनिता लोखंडे, संतोष वर्तक आणि सदानंद कोठावळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला.
शाळेतर्फे उपाध्यक्षा श्रीमती जयश्री विष्णू सावरा, सरचिटणीस श्री. यशवंत पाटील, मुख्याध्यापक श्री. प्रशांत देशमुख व श्री. उल्हास गोतारने तसेच वरिष्ठ शिक्षक श्री. गुरुनाथ पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
सौर ऊर्जेचा वापर करून विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी आवश्यक गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यावरणपूरक उपायांना प्रोत्साहन देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक सेवा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणारा हा उपक्रम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.






