Oplus_131072

​विलेपार्ले / मुंबई: विलेपार्ले (पश्चिम) येथील गुलमोहर रोड व इर्ला ब्रिज परिसरातील हनुमान नगर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या (Hanuman Nagar SRA CHS Ltd.) पुनर्वसन योजनेत झालेल्या कथित गैरप्रकार आणि प्रलंबित प्रशासकीय कारवाईवरून आता शासन-प्रशासनाची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. माहितीच्या अधिकारातून समोर आलेली कागदपत्रे आणि रहिवाशांच्या तक्रारींच्या आधारे, प्रकल्पातील विकासक मे. झोडिअॅक डेव्हलपर्स प्रा. लि., सह-विकासक, विकासकाचे कर्मचारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता थेट मुख्य कार्यकारी अधिकारी (SRA), राज्य शासन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि अन्य सक्षम यंत्रणांकडे करण्यात आली आहे.
​या प्रकरणातील उपलब्ध शासकीय नोंदींनुसार, मौजे विलेपार्ले येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांवरील (CTS Nos. 455, 455/1 to 16, 464(pt.), 1755 व 1756) या प्रकल्पाबाबत विविध स्तरांवर आधीच नोंदी व आदेश झालेले आहेत. महसूल व वन विभागाच्या ५ मार्च २००१ च्या पत्रात सर्व्हे क्रमांक ४६४ मधील शासकीय जमीन ‘रिक्रिएशन ग्राऊंड’ (RG) साठी आरक्षित असल्याचा उल्लेख करत, आवश्यक परवानग्या व ना-हरकतीशिवाय राबवलेल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने शासकीय जमिनीचा ताबा व प्रशासकीय जबाबदारीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. त्याशिवाय, मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका (PIL 129/2012 व PIL 43/2014) आणि सुधारित इरादा पत्रातील (LOI) अटींच्या अनुषंगाने जमिनीच्या हस्तांतरणाची बाबही कागदपत्रांमध्ये नमूद आहे.
​दुसरीकडे, प्रकल्पातील अंमलबजावणी आणि सोयीसुविधांच्या वाटपाबाबत रहिवासी व संस्थेकडून गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. २८ मे २०१५ च्या सुधारित LOI मध्ये ४२१ निवासी गाळे, १८८ प्रकल्पग्रस्त (PAP) सदनिका, ०७ बालवाडी, ०७ वेल्फेअर सेंटर आणि ०६ सोसायटी कार्यालयांची तरतूद असताना, पुनर्वसन इमारत क्रमांक ५ ला १९ एप्रिल २०१७ रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र (Full OC) मिळाल्यानंतरही १९ PAP खोल्या SRA कडे जमा न झाल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, मूळ हनुमान नगरच्या पात्र झोपडीधारकांऐवजी बाहेरील व्यक्तींना गाळे दिल्याचा, काही पात्र रहिवाशांना अपात्र ठरवल्याचा, काही घरांमध्ये विकासकाचे कर्मचारी राहून कागदोपत्री घरे बंद दाखवल्याचा, इमारत क्रमांक ४ च्या कथित विक्रीचा, सभासदांच्या ₹२०,०००/- अमानत रकमेच्या वापराचा आणि मालमत्ता करावरून महापालिकेच्या तगाद्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
​विशेष म्हणजे, कार्यकारी अभियंता (K/W प्रभाग, SRA) यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये उपजिल्हाधिकारी (विशेष कक्ष), SRA यांना पत्र पाठवून महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा अधिनियम १९७१ च्या कलम १३(२) अन्वये विकासकाविरुद्ध स्वयंप्रेरणेने कारवाई करण्याबाबत मा. CEO (SRA) यांच्या मान्यतेने पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे पाठवल्याचे स्पष्ट होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही (९ डिसेंबर २०२४) चौकशीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, चौकशीचे आदेश आणि प्रस्ताव असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
​इमारत क्रमांक १ ते ५ ची प्रत्यक्ष जागेवर तपासणी करून कागदोपत्री बंद दाखवलेल्या सदनिकांची खातरजमा करावी, इमारत क्रमांक ४ व प्रलंबित PAP सदनिका-सुविधा गाळ्यांची सखोल चौकशी करावी, कलम १३(२) अंतर्गत प्रलंबित कारवाई निकाली काढावी आणि दोषी आढळल्यास संबंधित विकासक, कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. प्रशासनाने १५ दिवसांत लेखी खुलासा न दिल्यास कायदेशीर व न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *