
मुंबई प्रतिनिधी :
महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून मजबुतीचे नाव आहे. त्यांच्याबद्दल जाणूनबुजून पसरवण्यात आलेल्या अनेक शंका आणि अफवांचा पुराव्यानिशी समाचार घेणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते चंद्रकांत झटाले यांनी केले. ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’च्या वतीने जनता केंद्र सभागृह, ताडदेव येथे आयोजित ‘वर्तमानातील ग्रामविनाश आणि महात्मा गांधीजीची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या या व्याख्यानात झटाले यांनी गांधीजींच्या विचारांवर सखोल आणि पुराव्यासह प्रकाश टाकला. गांधीजींबाबत समाजात निर्माण झालेले अनेक गैरसमज त्यांनी आपल्या मांडणीतून दूर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रभाकर नारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी आणि गांधी विचारवंत जयंत दिवाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश राणे यांनी केले, तर समितीच्या अध्यक्षा चित्रा राणे यांनी आभार मानले. या व्याख्यानाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
