
वृत्तसेवा, मुंबई :
प्रसूती उपचारांमधील वाढत्या गुंतागुंतीच्या काळात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील कायदेशीर नाते अधोरेखित करणारे महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाकडून अॅड. कपिल झोडगे यांना नुकतीच पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील कायदेशीर जबाबदाऱ्यांच्या चौकटी अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
‘प्रसूती उपचारांमधील वैद्यकीय निष्काळजीची दायित्वे’ (Liability for Medical Negligence in Obstetric Care) हा अॅड. झोडगे यांच्या शोधप्रबंधाचा मुख्य विषय होता. आजच्या काळात प्रसूती दरम्यान होणाऱ्या वैद्यकीय चुका आणि त्यानंतर उद्भवणारे कायदेशीर पेचप्रसंग यावर त्यांनी सखोल भाष्य केले आहे. हे संशोधन केवळ कायदेशीर क्षेत्रासाठीच नव्हे, तर आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीही दिशादर्शक ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. संजय जाधव, विधी विभागप्रमुख राजश्री वऱ्हाडी, प्रा. स्वाती राऊतेला आणि सहयोगी प्रा. शीतल शेठिया यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. एका संवेदनशील सामाजिक विषयाला कायद्याच्या चौकटीत राहून न्याय दिल्याबद्दल अॅड. कपिल झोडगे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या पदवीमुळे त्यांच्या नावापुढे आता ‘डॉक्टर’ ही मानाची पदवी लागली असून, त्यांच्या या यशाचे कौतुक समाजमनातून केले जात आहे.

