
ऑनलाईन वृत्त, मुंबई
राज्यातील गरजू रुग्णांना तातडीने आणि पारदर्शकपणे मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आता डिजिटल झेप घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या कक्षाच्या नवीन ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. ‘रुग्ण, रुग्णालय आणि शासन यांना एकत्र आणणारे हे एक प्रभावी व्यासपीठ ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे, आता उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ ८ कार्यालयीन तासांत दिली जाणार आहे.
राज्यासाठी पहिली ‘आरोग्य वॉर रूम’
आरोग्यविषयक विविध योजनांच्या एकत्रिकरणासाठी राज्यात प्रथमच ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे. मंत्रालयातील या वॉर रूमद्वारे अर्जांवर सतत देखरेख ठेवली जाईल, ज्यामुळे निर्णय प्रक्रियेला गती येईल. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे नवीन प्रणालीची माहिती दिली.
८ लाखांची ‘इम्युनो थेरेपी’ आवाक्यात येणार
कर्करोगावरील उपचारांसाठी वापरली जाणारी ‘इम्युनो थेरेपी’ अत्यंत महागडी आहे. एका इंजेक्शनची किंमत साधारण दोन लाख रुपये असून एकूण खर्च ८ लाखांच्या घरात जातो. हा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, या थेरेपीचा लाभ गरजू रुग्णांना मिळवून देण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. “योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवतानाच, दुहेरी लाभ (Duplicate benefits) टाळल्यास अधिक रुग्णांना मदत करता येईल,” असेही त्यांनी नमूद केले.
नवीन प्रणालीची खास वैशिष्ट्ये:
- पेपरलेस प्रक्रिया: कागदपत्रांच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीशिवाय संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार.
- रुग्णालयामार्फत अर्ज: रुग्णांना स्वतः धावपळ करण्याची गरज नाही; ३,००० हून अधिक नोंदणीकृत रुग्णालयांतून थेट अर्ज करता येईल.
- रिअल-टाइम ट्रेकिंग: अर्जाची स्थिती रुग्णांना एसएमएस आणि लिंकद्वारे मोबाइलवर कळणार.
- डिजिटल पडताळणी: [आधार], उत्पन्न प्रमाणपत्र आणि शिधापत्रिकेची तात्काळ ऑनलाइन पडताळणी होणार.
- थेट लाभ हस्तांतरण (DBT): मंजूर निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा होणार, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल.
’मुख्यमंत्री हृदय संजीवनी’ आणि ‘रुग्ण मित्र’
हृदयविकाराच्या उपचारांशी संबंधित ‘स्टेमि ईसीजी’ तपासणीला आता ‘मुख्यमंत्री हृदय संजीवनी’ असे नाव देण्याचे सुचवण्यात आले आहे. तसेच रुग्णांना २४x७ मार्गदर्शन मिळावे यासाठी १८०० १२३ २२११ हा टोल-फ्री क्रमांक (रुग्ण मित्र) सुरू करण्यात आला आहे. यावरून जवळची रुग्णालये, रक्तपेढ्या आणि रुग्णवाहिकांची माहिती डिजिटल लिंकद्वारे उपलब्ध होईल.
लोकसहभागातून उपचार
महागड्या आजारांसाठी निधी कमी पडू नये म्हणून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) आणि स्वयंसेवी संस्थांसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. रुग्णालय, सीएसआर संस्था आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे गंभीर आजारांच्या उपचारांचा भार संयुक्तपणे उचलला जाणार आहे.
या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव आणि अधिकारी उपस्थित होते.
