
प्रतिनिधी, मुंबई:
”मराठी भाषेची आज जी गळचेपी होत आहे, त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. समोरची व्यक्ती हिंदी भाषिक असली की आपण लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्या राज्यात आली आहे, त्यामुळे आपण मराठीतच संवाद साधला पाहिजे आणि त्यांनीही मराठीतच बोलले पाहिजे,” असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध अभ्यासक डॉ. दीपक पवार यांनी केले.
मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) तर्फे गोरेगाव येथील मृणाल गोरे कलादालनात शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी ‘मराठी भाषा: अभिमान की आव्हान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
केंद्राच्या धोरणांवर टीका
मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना डॉ. पवार म्हणाले की, “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी केंद्र सरकारने तिच्या संवर्धनासाठी अद्याप एक रुपयाही दिलेला नाही. सध्याचे सरकार केवळ निवडणुका जिंकण्यासाठी घोषणाबाजी (जुमले) करत असून प्रत्यक्ष कामाचा अभाव आहे. सरकारकडून जाणूनबुजून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.”
मुंबईतील बदलत्या लोकसंख्येचे आव्हान
मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी भाषिकांची संख्या घटत चालल्याबद्दल त्यांनी धोक्याचा इशारा दिला. “हिंदी भाषिक आता आपल्या गावागावात पोहोचले आहेत, हे मराठी भाषेसमोरचे खरे आव्हान आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बँकेचे माजी संचालक विश्वास उटगी आणि जनता दलाचे कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दिनेश राणे यांनी केले. या व्याख्यानाला मुंबईतील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘मास’चे मीरा-भाईंदर प्रमुख घनश्याम आंबोकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


