
युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त, वसई-विरार
वसई-विरार शहरातील नाळा गावातील प्रलंबित समस्या आणि नागरी विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह महापौर अजीव पाटील यांची भेट घेतली. या वेळी महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करत गावकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले.
नाळा गावातील नागरी समस्या, रस्ते, स्वच्छता तसेच विकासकामांबाबत नागरिकांमध्ये तक्रारी होत्या. लोकनेते हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमहापौर मार्शल लोपीस आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या सहकार्याने नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर, सॅरल डाबरे आणि परेश किणी यांचा प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता.
अधिकाऱ्यांना थेट निर्देश
महापौर अजीव पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत गावकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. प्रश्नांचे गांभीर्य ओळखून महापौरांनी तत्काळ संबंधित विभागाच्या महापालिका अधिकाऱ्यांना सभागृहात बोलावून घेतले. कार्यकर्त्यांसमवेत सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
शिष्टमंडळाची उपस्थिती
या बैठकीत बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश राऊत, मायकल कोरीया, संजय म्हात्रे, कुमार तांडेल, मोहिनी भोईर, नितेश चौधरी, राकेश म्हात्रे, सुधीर कांबळे, आदित्य म्हात्रे, कैलास पाटील आणि ॲड. चेतन भोईर सहभागी झाले होते.
प्रश्नांची तातडीने दखल घेतल्याबद्दल शिष्टमंडळाने महापौरांचे आभार मानले. नाळा गाव आणि प्रभागातील नागरिकांचे सर्व प्रश्न सनदशीर व कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भविष्यातही कटिबद्ध राहील, असा विश्वास नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांनी व्यक्त केला.
