प्रतिनिधी , मुंबई

देशात सर्वधर्मसमभाव आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने रविवारी मुंबईत ‘ईद मिलन मिलाप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सद्भावना मंच’ आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात राजकीय भिंती ओलांडून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावत ‘एकात्मता आणि भाईचारा’ हाच देशाचा खरा कणा असल्याचे अधोरेखित केले.

मैत्रीला धर्माची भिंत नसते!

​कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि गांधीवादी विचारक जयंत दिवाण (सर्वोदय मंडळ) यांनी आपल्या भाषणात मानवी मूल्यांवर भाष्य केले. तर, साहित्यिक परीक्षक गुलाम अरिफ खान यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला. रामेश्वरममधील कलामांचे बालपण रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिवप्रकाशन या तीन सनातनी हिंदू ब्राह्मण मित्रांच्या सहवासात कसे बहरले, याचे उदाहरण त्यांनी दिले.

​”शास्त्री आणि कलाम यांची मैत्री ही केवळ दोन मुलांची मैत्री नव्हती, तर ती भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक होती. आजच्या काळातही हाच वारसा पुढे नेण्याची गरज आहे,” असे मत खान यांनी व्यक्त केले.

सर्वपक्षीय उपस्थितीने वाढली रंगत

​कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर दिसलेली राजकीय विविधता. स्थानिक नगरसेवक तेरेन मेंडोसा, माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गुलाम नबी फारुकी आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव अनिल भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय मनसे, शिवसेना (शिंदे गट) या पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते, जे सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण ठरले.

श्रत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​रविवारची सुटी असूनही हॉल श्रोत्यांनी गच्च भरला होता. ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’चे पदाधिकारी दिनेश राणे, राजन नेरुरकर, चित्रा राणे, घनश्याम आंबोकर आणि किशोर केदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ॲड. अलका कुरेशी यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत सूत्रसंचालन केले, तर साबीर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *